आदित्य ठाकरे साधणार मुंबईतील तरुणांशी संवाद

सामना ऑनलाईन । मुंबई

तरुणाईच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देण्यासाठी तसेच तरुणांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार, 22 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमातून मुंबईच्या युवक-युवतींशी संवाद साधणार आहेत. शहरात तसेच सोशल मीडियावर कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमाला या आधी संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक या प्रमुख शहरांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात ते सुमारे 6 लाख युवकांशी थेट तर 15 लाख युवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम 18 ते 35 वयोगटातील उपस्थित मुंबईकरांसाठी खुला आहे. युवकांनी मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची मोठय़ा प्रमाणात नोंदणी केली असून इच्छुक तरुण www.adityasanvad.com या संकेतस्थळावर नोंदणी करून कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. या कार्यक्रमासाठी 20 हजार युवकांची नोंदणी झाली आहे. जास्तीत जास्त युवकांनी आदित्य संवाद या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांवर त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा, असे आवाहन मुंबई युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.