Aaditya Thackeray- दुष्काळाचे राजकारण नको; शेतकऱ्यांच्या आत्महत्या नको

17
aaditya-thackeray-solapur-mohol


सामना प्रतिनिधी । सोलापूर

दुष्काळाचे राजकारण नको; शेतकऱ्यांच्या आत्महत्या नको, शिवसेना कायम बळीराजाच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे सांगत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जनावरांसाठी चारा आणि पाण्याच्या टाक्या देऊन बळीराजाला दिलासा दिला. आत्महत्येसारखे पाउल न उचलता शेतकऱ्यांनी आलेल्या परिस्थितिचा मुकाबला केला पाहिजे, असे सांगत संकटसमयी शिवसेनेला फक्त आवाज द्या शिवसेना आपल्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचा सामना करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील काम रखडलेल्या पोखरापूर तलावाची पाहणी करून कोरडा तलाव पाहून चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी सारोळे या गावात जाऊन लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी चारा आणि नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी हजारो शेतकऱ्यांसमवेत बसून सर्वप्रथम दुष्काळाबाबत चर्चा केली. गिरीधर वैजिनाथ मोटे या पहिलीत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला जवळ घेतले. शेतकऱ्यांनी यंदाच्या दुष्काळाबाबत आपल्या अडचणी आदित्य यांना सांगितल्या आणि टोकाचे पाऊल न उचलता गंभीर झालेल्या दुष्काळाबाबत शिवसेना खंबीर असल्याचे सांगत संपूर्ण ताकतीनिशी पाठीशी उभारण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

आदित्य ठाकरे जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, दुष्काळाची भीषण परिस्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. नागपूर,परभणी,हिंगोली, लातूर या भागाचा आपण दौरा केला. सर्वत्र पशुखाद्य,चारा आणि पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशावेळी  जगावे कसे हा प्रश्न पडला आहे. पावसाने दांडी मारल्याने पाणी आणायचे कोठून असा प्रश्न सर्वत्र सतावत आहे. हा प्रश्न विचारात बसण्यापेक्षा आणि राजकारण करत बसण्यापेक्षा शिवसेनेने दुष्काळ कितीही भयानक असला तरी शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ पाहणी दौरा नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टाक्या हि मदत आपण घेऊन आलो आहोत. कितीही मदत दिली तरी कमीच पडणार आहे. परंतु मदतीची सुरुवात आजपासून करत आहे. गावोगावी टाक्या बसविण्यात येणार आहेत. आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्या टाक्यांमध्ये शिवसेना टँकरने पाणी आणून टाक्या भरेल असेही ते म्हणाले.

दुष्काळाचा सामना करताना सर्वांनी मिळून खांद्याला खांदा लावून काम करू. शेतकऱ्यांनी घाबरू नये व लाजूही नये शिवसेना आपल्या मदतीला धावून येईल. शेतकऱ्यांनी स्वतः बरेवाईट करण्याचा विचार मनात आणू नये. वाईट विचार येण्याआधी आठवण काढायची असेल तर शिवसेनेची आठवण काढा. कर्तव्य म्हणू शिवसेना आपल्याकडे येईल आणि मदत करेल असेही ठाकरे म्हणाले. मदत  झाली आहे आणि ती वाढत जाणार आहे. अन्नदाता शेतकरी अडचणीत असताना त्याच्यासोबत सर्वांनी रहावे, असेही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

राजकारण आणि निवडणूक म्हणून नाही तर पोखरापूर तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण मुंबईत मिटिंग लावून स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असते म्हणून कर्तव्य म्हणून आपण हे कर्तव्य पूर्ण करणार आहोत, असे अभिवचनही ठाकरे यांनी दिले.

बळीराजाला धीर देण्यासाठीच दौरा

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना आणि जिल्हा प्रशासन व सरकारसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत असताना संकटात असणारा बळीराजा आणि त्यांच्या मुक्या जनावराची काळजी करण्यासाठी बळीराजाला धीर देण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागात दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधत दुष्काळाची दाहकता जाणून घेतली आहे. सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातही दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे.

पिचलेल्या बळीराजाची अशीही दानत

सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा दुष्काळाने होरपळून गेला आहे. ग्रामीण भागात तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. यंदा बळीराजा हुरड्यालाही महाग झाला होता. असे असताना सारोळे गावात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आल्यानंतर गावातील एक शेतकरी मारुती भानुदास शेळके यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी हिरवीगार हुरड्याच्या कणसाची आणलेली पेंढी त्यांना भेट दिली. स्वतःचे शेत पाण्याअभावी जळून गेलेले असताना त्याचे दुःख विसरून शेळके यांनी आदित्य यांना हिरवीगार ज्वारीची पेंढी देऊन कितीही अडचणीत असलो तरी अतिथी देवो भवची संस्कृती विसरणार नाही असे सांगत दानत दाखवून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या