नेरुळमध्ये रंगला आगरी-कोळी महोत्सव

सामना ऑनलाईन । नेरूळ

नवी मुंबईमध्ये सर्वाधिक गर्दीचा महोत्सव म्हणून ख्याती असलेला अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या आगरी-कोळी महोत्सव उद्यापासून नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदानात सुरू होत आहे. १२ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये प्रत्येक दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असून नवी मुंबईच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.

नेरूळ येथील सेक्टर १२ मधील श्री गणेश रामलीला मैदानावर यंदा बाराव्या आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या विशेष पुढाकारातून साजरा होत असलेल्या महोत्सवामध्ये १४ जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत.

आजच्या तरुण पिढीला आगरी-कोळी संस्कृतीच्या रुढी परंपरा समजाव्यात, त्यांना आपल्या संस्कृतीचे जवळून दर्शन व्हावे यासाठी अनेक उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले आहेत. संगीतप्रेमी आणि कलारसिकांना हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.