भाजपला दिल्लीत तडाखा; बवाना विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’चा दणदणीत विजय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पार धुव्वा उडालेल्या आम आदमी पार्टीने जोरदार उसळी मारत विधानसभेच्या बवाना या एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून भाजपला आज पराभवाचा जबरदस्त तडाखा दिला. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या मतांमध्ये २०१५ पेक्षा निम्म्याने घसरण झाली आहे.

बवाना या जागेवर आम आदमी पार्टीचे उमेदवार रामचंदर यांनी ५९ हजार ६८८ मते मिळवत भाजपचे उमेदवार वेदप्रकाश यांचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव केला. वेदप्रकाश यांना ३५ हजार ८३४ मते मिळाली. या मतदारसंघात आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस अशी चुरशीची तिरंगी लढत झाली.

‘आप’च्या बंडखोराला दत्तक घेणे भाजपला भोवले
भाजपचे पराभूत उमेदवार वेदप्रकाश हे याआधी ‘आप’चेच आमदार होते. पण केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी माजी मंत्री कपिल मिश्रा यांच्यासोबत बंड केले होते. वेदप्रकाश यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने त्यांना ‘दत्तक’ घेतले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच बवाना या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. ‘आप’ने ती लढाई जिंकल्याने भाजपच्या विजयी वारूला ‘झाडू’चे फटके बसल्याची प्रतिक्रिया केजरीवाल गोटात उमटली.

काँग्रेसच्या मतांमध्ये दुपटीने वाढ
काँग्रेस उमेदवार सुरेंदर कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी त्यांनी ३१ हजार ९१९ मते मिळवून काँग्रेसच्या मतांमध्ये २०१५ पेक्षा दुपटीने वाढ केली आहे. या पोटनिवडणुकीतील विजयाने ‘आप’ला चेतना मिळाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.