वाढदिवसाला आमीरने केली नव्या चित्रपटाची घोषणा, वीस किलो वजन कमी करणार

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याने आज त्याच्या 54 व्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. आमीरने आजच्या दिवसाचा मुहुर्त साधत त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. आमीर लवकरच आपल्याला ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी आमीर तब्बल 20 किलो वजन कमी करणार आहे.

‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कार विजेता ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक असून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याचे शूटींग सुरू होणार आहे. या चित्रपटाची कथा ही मराठी चित्रपटसृष्टी व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी याने लिहली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे. अद्वैतने याआधी आमीरचा सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.

‘या चित्रपटाचे शूटींग जरी ऑक्टोबरपासून सुरू होणार असले तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. डॉ. धुरंदर यांनी मला डाएट लिहून दिले असून या डाएट व जीमच्या मदतीने मी सहा महिन्यात वीस किलो वजन कमी करणार आहे. पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो’, असे आमीरने यावेळी सांगितले.