आपचा नवा डाव, रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठविणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याचे समजते. आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजन यांच्यासमोर राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवल्याचे कळते आहे. जर राजन यांनी हा प्रस्ताव मान्य केला तर केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा विरोध करण्यासाठी आम आदमी पक्षाने आखलेली रणनीती यशस्वी होऊ शकते.

दिल्ली विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या तीन जागा लवकरच रिक्त होणार असून त्या जागांसाठी जानेवारीमध्ये निवडणूक होणार आहे. यातील एका जागेसाठी राजकारणात नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचे आपने ठरविले आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ‘आप’ने राजन यांना पाठविलेला आहे.

‘रघुराम राजन हे जागतिक स्तरावरचे अर्थतज्ज्ञ आहेत. ते रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर देखील होते त्यामुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे. त्यामुळे सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत संसदेत प्रतिवाद करण्यासाठी राजन हे योग्य व्यक्ती आहेत’, असे आपच्या एका नेत्याने सांगितले.