‘आप’ नेत्यांची इन्सुलिनसह तिहारवर धडक; मोदी सरकार ब्रिटिशांपेक्षा क्रूर असल्याचा आरोप

मद्य धोरण प्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरुंगातच हत्या करण्याचा कट मोदी सरकारने रचला असून त्यांच्यावर योग्य औषधोपचार केले जात नसल्याचा आरोप आपने केला आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात आम आदमी पार्टीचे नेते आज प्रचंड आक्रमक झाले. दिल्लीच्या मंत्री अतिशी यांच्या नेतृत्वाखाली आपच्या नेत्यांनी इन्सुलिन घेऊनच तिहार जेलवर धडक दिली.

अतिशी यांनी 18 एप्रिल रोजी केजरीवाल यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आणि इन्सुलिन देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

अतिशी यांच्यासोबत आपचे आमदार संजीव झा यांच्यासह इतर नेतेही होते. केजरीवाल यांना इन्सुलिन द्या, असे लिहीलेले फलक घेतलेले आपचे कार्यकर्तेही यावेळी तुरुंगाबाहेर उपस्थित होते. यावेळी रघुपती राघव राजाराम गाणे गात मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे नुसतेच आंदोलन नसुन दिल्लीच्या जनतेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काळजी आहे, असे अतिशी यावेळी म्हणाल्या.  दुसरीकडे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी रांची येथील सभेत मोदी सरकारच्या दडपशाहीवरून निशाणा साधला. पेंद्र सरकारला केजरीवाल यांची तुरुंगातच हत्या करायची आहे. त्यांना योग्य औषध दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. केजरीवाल आणि सोरेन यांना तुरुंगात टाकण्यावरून सरकारची हुकुमशाहीच उघड होते, असेही त्या म्हणाल्या.

मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड

केजरीवाल यांची प्रकृती स्थिर असल्याचा आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित असल्याचा दावा तुरुंग प्रशासन करत आहे. परंतु, तुरुंग प्रशासनाचा प्रत्येकवेळचा अहवाल खोटा असून त्यांनी साखरेची पातळी वाढल्याचा अहवाल दडपल्याचा आरोप आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. तसेच आता तुरुंग प्रशासनाने एम्सकडे पत्राद्वारे एखाद्या अनुभवी मधुमेहतज्ञाची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. यावरून मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड झाल्याचे भारद्वाज म्हणाले

क़ेजरीवालांची शुगर लेवल 300 हून अधिक

केजरीवाल हे 21 दिवसांपासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांची साखरेची पातळी 300 च्याही पुढे जात असून तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारा, इतकी मोठी साखरेची पातळी इन्सुलिनशिवाय नियंत्रणात येऊच शकत नाही. भाजपप्रणीत सरकारच्या इशाऱयावर तुरुंग प्रशासन केजरीवाल यांना इन्सुलिन देत नाही. ब्रिटिश सरकारच्या जमान्यातच अशी क्रूरता होती, असा आरोप अतिशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला