नवीन आर्थिक वर्षात मालमत्ता कर बिल शून्य येणार; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना चपराक

1

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत मालमत्ता कर रद्द करण्यावर शिवसेना-भाजप युतीचे सरकार ठाम असून 2019-20 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले अद्याप निघालेली नाहीत. नवीन वर्षात मालमत्ता कराची बिले तयार होतील तेव्हा 500 चौरस फुटांच्या घरांना कोणताही मालमत्ता कर लागणार नाही, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अॅड. आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.  केवळ 11 टक्के मालमत्ता कर माफ केला असे विधान करून काँग्रेसने अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द केल्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता कराच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने शिवसेना-भाजप युतीवर टीका केली आहे. त्याकडे आशीष शेलार यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यांनी अतिशय सविस्तरपणे त्याची माहिती दिली. केवळ 11 टक्के मालमत्ता कर कमी झाला ही माहिती कमी अभ्यासामुळे काँग्रेसने दिली आहे. सर्वसाधारण कर हा मालमत्ता करातून निघणारा सर्वात मोठा कर आहे. त्यासाठी अध्यादेश काढताना सेक्शन ए (क) मध्ये बदल झाला आहे. मुळात सर्वसाधारण कर हा ज्या इमारतीला पाण्याचे कनेक्शन आहे अथवा नाही त्या आधारावर बदलत असतो. त्या इमारतींना पाण्याचे कनेक्शन आहे त्याला तो 31 टक्क्यांपर्यंतही असतो. ज्या इमारतींना पाण्याचे कनेक्शन नाही त्यांना तो 11 टक्क्यांपर्यंत जातो. म्हणूनच ही फसवेगिरी नाही. त्यामुळे फक्त 11 टक्के मालमत्ता कर कमी केला हे अज्ञानाचे प्रदर्श करण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी काँग्रेसला मारला.

राज्याची बदल प्रक्रिया सुरू

यापूर्वी निघालेल्या अध्यादेशानंतर पालिकेच्या कायद्यात बदल झाला आहे. आता राज्य सरकारच्या कायद्यातील बदलाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्य सरकारच्या कायद्यात बदल झाल्याशिवाय स्टेट एज्युकेशन सेस, ट्री सेस, एम्लॉयमेंट गॅरेटी सेस हे तीन कर रद्द होऊच शकत नाही. हे तीन कर रद्द करण्यासाठी कायद्याची प्रक्रिया सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

 विधानसभेत काँग्रेसने विरोध केला

त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांनी मुंबईकारांमध्ये भीती पसरवू नये. 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या संदर्भात विधानसभेत जेव्हा चर्चा झाली तेव्हा काँग्रेसच्या आमदारांनी विरोध का केला याचे उत्तर मिलिंद देवरा यांनी दिले पाहिजे, असे आव्हान आशीष शेलार यांनी दिले.

 रद्द होणारे मालमत्ता करातील उपकर

  • जलकर
  • जललाभ कर
  • मलनिस्सारण कर
  • मलनिस्सारण लाभ कर

 म्युनिसिपल एज्युकेशन सेस

  • ट्री सेस
  • स्ट्रीट टॅक्स
  • एम्लॉयमेंट गॅरेटी सेस
  • स्टेट एज्युकेशन सेस