चिकन ते चटपटीत चाट

 मांसाहार विशेष आवडीचा. बाहेर शेवटचा शाकाहार कधी केला तेही आता लक्षात नाही. सांगत आहेत आशुतोष गोखले

 • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ? – खाणं म्हणजे ‘जगणं’
 • खायला काय आवडतं ? – मांसाहारी पदार्थ आणि हेल्दी नसलं तरी चटपटीत पदार्थ खायला जास्त आवडतात. मला कोणी चॉइस दिला तर रोज मांसाहार करायला आवडेल.
 • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ? –   गेल्या सहा महिन्यांपूर्वी फिटनेसची काळजी अशी कधी घेतली नव्हती. जेवढं खायचो तेवढच माझं व्यायामही असायचा. त्यामुळे तशी कधी वेळ आली नाही. पण अचानक मला अशी जाणीव झाली की, आता स्वतःची ठरवून काळजी घ्यायला हवी. त्यामुळे मी आता ठरवून डाएट आहार घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये मांसाहारी पदार्थ आहेत फक्त ते चटपटीत नाहीत एवढंच. उकडलेलं चिकनही मी आवडीने खातो. आता व्यवस्थित डाएट करतो. खाण्याच्या बाबतीत जागरुक झालोय.
 • डाएट करता का ? – सुदैवाने शरीर प्रमाणाबाहेर वाढलेलं नसल्याने हार्डकोर डाएट घेत नाही. माझ्या डाएटमध्ये नेहमी जे पोळी, भाजी वगैरे अन्न खातो तेच खायचं असतं. फक्त ते दोन तासांच्या अंतराने प्रत्येक खाणं असतं. सकाळी हेवी नाश्ता करतो. यामध्ये उकडलेली अंडी, प्राउट असतं. रात्रीच्या जेवणात पोळ्या कमी आणि सलाड जास्त असतात. हे मी गेले पाच-सहा महिन्यांपासून करतोय.
 • आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता ? -चित्रीकरणादरम्यान  बाहेर खावं लागतं. पण डाएट करायला सुरुवात केल्यापासून घरून डबे न्यायला सुरुवात केली. स्वतःला काही बनवता येत नाही. माझी आई मला डबे बनवून देते. त्यामुळे बाहेर असलो तरी घरचं खाणं होतं. तरी आठवडय़ातून तीन-चार वेळा बाहेरच एक वेळच खाणं होतं.
 • कोणत्या हॉटेलमध्ये जाता ? – मी बाहेर कुठेही असलो तरी मांसाहारीच पदार्थ खाल्ले जातात. मला आता आठवतही नाहीए की, शेवटचा शाकाहारी पदार्थ बाहेर कधी खाल्लय. त्यातही मोगलाई किंवा दक्षिण हिंदुस्थानी पदार्थ माझ्या विशेष आवडीचे आहेत. जिथे हे पदार्थ चांगले मिळतात. तिथे मी जातोच.
 • कोणतं पेय आवडतं ? – सोलकढी खूप आवडते. कधी कधी दिवसा पीयूष प्यायला आवडतं.
 • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता  ? – सहसा मी प्रयोगाच्या आधी खात नाही. अशा वेळी खाण्याची वेळ पाळली जात नाही. रात्री नऊचा प्रयोग असेल तर रात्री बारा वाजता जेवतो. नाटकाच्या दौऱ्यानिमित्त वेळा पाळणं बऱ्याचदा अवघड जातं.
 • दौऱ्यानिमित्त आवडलेला खास पदार्थ? – महाराष्ट्रात विदर्भात आम्ही जातो तेव्हा शेवेची भाजी खूप आवडते. ती मुंबईत कोठे मिळत नाही, पण दौऱयांना बाहेर जातो तेव्हा खास रात्रीच्या जेवणावेळी धाब्यावर थांबून आवर्जून शेव भाजी खातोच.
 • स्ट्रीट फुड आवडतं का ? –  वडा पाव नाही, पण चाटमधले सगळे पदार्थ खूप आवडतात. शिवाजी पार्कच्या चाटवाल्याकडची शेवपुरी, दहीपुरी माझ्या खूप आवडीची आहे.
 • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? – घरी केलेल्या स्वयंपाक सगळ्या प्रकारच्या उसळी आवडतात. त्यामध्ये मसूरची उसळ माझी फेव्हरेट आहे.
 • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खाऊ घालता ? – माझी आई पाव-भाजी खूप छान करते. पाहुणे घरी येतात तेव्हा पाव-भाजीचा बेत असतोच असतो.
 • उपवास करता का ? – अजिबात नाही. घरचे करतात.
 • स्वतः बनवू शकता अशी रेसिपी ? – ज्यावेळी मी एकटा घरी असतो तेव्हा हाफ फ्राय, भुर्जी, ऑमलेट, फ्रेंच टोस्ट, दोन ऑमलेटच्या मध्ये चीझ घालून केलेलं चीझ ऑमलेट, तसेच बऱ्याच जणांना तूप, मेतकूट, भात आवडतो, पण मी कधीतरी भाताबरोबर तूप लसूण चटणी, मॅगीचे वेगवेगळे प्रकार  असे पदार्थ करून खातो. वेगवेगळ्या पदार्थांवर  प्रयोग करायला आवडतं.
आपली प्रतिक्रिया द्या