चिमुरडय़ाचे अपहरण करताना क्लोरोफॉर्मने चेहरा होरपळला

सामना ऑनलाईन । बदलापूर

पैशांची प्रचंड चणचण असल्याने पाच लाखांच्या खंडणीसाठी मालकाच्या मुलाचे अपहरण करण्याचा डाव या मुलाच्या बहिणीमुळे उधळला गेला आहे. तोंडाला क्लोरोफॉर्म लावून त्याला रिक्षातून पळवून नेण्याआधीच बहिणीने पाहिल्याने अपहरणकर्त्या नोकराने मुलाला रिक्षातून फेकून पळ काढला. पण रुमालावर ओतलेल्या क्लोरोफॉर्ममुळे या चिमुकल्याचा चेहरा होरपळला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बदलापूर पूर्व येथील गोपाळ हाईट्स या इमारतीत बांधकाम व्यावसायिक शेखर परब राहतात. त्यांचा सात वर्षांचा मुलगा आरूष हा नेहमीप्रमाणे इमारतीच्या परिसरात खेळायला गेला. मात्र बराच वेळ झाल्याने तो आला नाही म्हणून आरूषच्या बहिणीने इमारतीच्या परिसरात त्याची शोधाशोध सुरू केली. इमारतीच्या मागील बाजूस तिला त्यांचा जुना नोकर सुनील पवार हा आरूषचे तोंड, हात दाबून जबरदस्तीने रिक्षात बसवत असल्याचे दिसले. तिने आरडाओरडा केल्यावर पवार याने आरूषला रिक्षातून फेकले व पळून गेला. पोलिसांमध्ये तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुनील पवारला शिताफीने अटक केली.

माहितीतला जुना नोकर पवार हा परब यांचा जुना नोकर होता. त्याला परब कुटुंबाची संपूर्ण माहिती होती. त्याने नोकरी सोडली होती पण पाच लाखांची गरज होती म्हणून त्याने आरूषचे अपहरण करण्याचा प्लॅन रचला. इमारतीखाली खेळत असलेल्या आरूषला त्याने इमारतीच्या मागे नेले आणि तेथे असलेल्या रिक्षात त्याला कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याची शुद्ध हरपावी यासाठी त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्म टाकून रुमाल दाबला, परंतु या क्लोरोफॉर्मची मात्रा जास्त झाल्याने आरूषचे तोंड होरपळले.