पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

सामना ऑनलाईन । भूगाव

कुस्ती क्षेत्रामध्ये अत्यंत मानाची समजली जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पुण्याचा पैलवान अभिजीत कटके आणि साताऱ्याचा पैलवान किरण भगत यांच्यात रंगला. या सामन्यात अभिजीत कटकेने किरण भगतचा १०-७ असा पराभव केला आणि मानाची चांदीची गदा पटकावली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या फेरीत अभिजीत आघाडीवर होता, मात्र दुसऱ्या फेरीत किरणने पलटवार करत आघाडी मिळवली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत अभिजीतने किरणवर वर्चस्व गाजवत सामना १०-७ अशा फरकाने जिंकला.

पुण्याचा अभिजीत कटके हा मॅट प्रकारात तर साताऱ्याचा किरण भगत हा अस्सल मातीच्या मैदानावर खेळणारा पैलवान आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना मॅट प्रकारात झाला. मात्र या सामन्यात किरण भगतने अभिजीत कटकेला तुल्यबळ लढत दिल्याचे कुस्ती समिक्षकांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि केंद्रीत मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामना झाला. पुण्याच्या भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत कुस्तीचा महामुकाबला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.