सौंदर्याबरोबरच आरोग्य टिकविण्यासाठी करा अभ्यंगस्नान

सामना ऑनलाईन | मुंबई

दिवाळीत अभ्यंगस्नानाला खूपच महत्त्व आहे. सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून त्याने मालिश करावी.

– साधारणपणे तीस ते चाळीस मिनिटे संपूर्ण अंगाला तेल लावून मसाज करायचा. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. अभ्यंग करताना पाठ, पोट व छाती यावर मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे.

– अभ्यंग हे सकाळी आंघोळीपूर्वी आणि व्यायाम करण्यापूर्वी करावा. अभ्यंगानंतर शरीरास उटणे चोळून आंघोळ केल्याने शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद कमी होऊन शरीर दृढ बनते. त्वचेचा टोन सुधारतो. त्वचेचा रंग उजळतो, त्वचेवरील लव कमी होते.

– उटणे सुगंधी म्हणजे वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो.

– आंघोळीच्या वेळेस साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते.

– शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तेल वातनाशनाचे काम करतात. त्यामुळे वातविकाराचे  शमन होते, त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नष्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते.

– आयुर्वेदानुसार आठ वेळा तूप खाण्यापेक्षा एकदा तैलाभ्यंग करुन घेणे सरस ठरते. दृष्टी तेजस्वी होते व मन समाधानी होऊन झोप चांगली लागते.

– शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम म्हणजेच अभ्यंग. या क्रियेमुळे स्नायूंना गती, चालना मिळून ते सुरळीत काम करु लागतात.

– अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्षण क्रियेने उष्णतेची निर्मिती होते. परिणामी त्वचेखालील अतिरिक्त चरबी वेगवेगळी होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकली जाते.

– शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक रक्त शुद्ध होऊन शरीराची कांती लकाकते. शरीरात असणाऱया वेदना, सूज या तैलाभ्यंगाने नष्ट होते.

– नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.

– अभ्यंगासाठी तिळाचे तेल सर्वात चांगले आयुर्वेदिक औषध म्हणून मानले जाते.