कुठे गेली कर्जमाफी? तीन महिन्यांत ६९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या वर्षी जून महिन्यात जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही २०१८च्या पहिल्या तीन महिन्यांत ६९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांत झालेल्या आत्महत्यांच्या तुलनेने हा आकडा जास्त असल्याचंही समोर आलं आहे. मुख्य म्हणजे यातील फक्त २०६ म्हणजेच २९ टक्के शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे मराठवाडा आणि विदर्भात जास्त आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षी २१५ आत्महत्या झाल्या होत्या. तो आकडा यंदा २४४वर पोहोचला आहे. विदर्भात गेल्या वर्षी ३५३ आत्महत्या झाल्या होत्या. त्या तुलनेने यंदा हा आकडा २४ ने कमी झाला असून यंदा ३२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करूनही हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.

कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही आत्महत्या होण्याचं मुख्य कारण अंमलबजावणीमधील दिरंगाई असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. सरकारी माहितीनुसार, ७ मार्चपर्यंत कर्जमाफीची १३ हजार ७८२ कोटी इतकी रक्कम ३७ लाख शेतकऱ्यांना मिळाली आहे. तसेच, कर्जमाफी जाहीर झालेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या तब्बल ६९ लाख इतकी आहे. मात्र, कर्जमाफी प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. या शिवाय सरकारने पिकांना दुप्पट हमीभाव मिळवून देण्याचे जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळी आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने देखील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळेच आत्महत्यांचं प्रमाण कमी होत नसल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे.