पालिकेने सील केलेल्या अभ्यासिकेचे कुलूप तोडले-‘अभाविप’चे आंदोलन

3

सामना ऑनलाईन ,नाशिक,

दि. 11 (प्रतिनिधी) – महापालिकेने सील ठोकून बंद केलेल्या अभ्यासिकेचे कुलूप तोडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली.

सामाजिक संस्थांच्या ताब्यातील महापालिकेच्या मिळकतींच्या गैरवापरासंदर्भात उच्च न्यायालयाने खडसावल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील वाचनालये, अभ्यासिका, व्यायामशाळांना सील ठोकून ते बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अशोकस्तंभ परिसरातील उपाध्ये अभ्यासिकेसमोर घोषणाबाजी करीत त्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला. महापालिकेने ठोकलेले टाळे तोडून अभ्यासिकेत प्रवेश केला, अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली. या आंदोलनात अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, जिल्हा संयोजक सागर शेलार, शर्वरी अष्टपुत्रे, नितीन पाटील, तेजस जाधव, गौरी पवार, तेजल चौधरी, उत्तम पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.