कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास कूल कूल, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे वातानुकूलित बसेस रस्त्यावर

1

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण-डोंबिवलीतील उष्णतेचा पारा चाळिशीच्या वर गेल्याने नागरिकांची लाही लाही होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने प्रवाशांना खूशखबर दिली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास कूल व्हावा यासाठी सध्या बंद असलेल्या १० वातानुकूलित बसेस रस्त्यावर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन बैठकीत शिवसेना सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यावर येत्या चार दिवसांत सर्व वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावतील, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली.

कल्याण-डोंबिवलीत अचानक तापमानात वाढ झाली आहे. उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी नागरिकांनी गॉगल, टोपी यांचा आधार घेतला आहे. आठ दिवसांपासून दररोज चाळिशीच्या वर उष्णतेचा पारा असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर परिवहन बैठकीत शिवसेना सदस्य संतोष चव्हाण यांनी वातानुवूâलित बसेस रस्त्यावर का धावत नाहीत, असा सवाल केला. यावर प्रभारी व्यवस्थापक सु. रा. पवार यांनी बसेस नादुरुस्त असल्याचे मोघम उत्तर दिले. यावर सर्व सदस्य संतप्त झाले. अधिकाऱ्यांना कमिशन मिळत नाही म्हणून बसेस दुरुस्तीबाबत चालढकल केली जाते, असा स्पष्ट आरोप सदस्यांनी केला.

वातानुकूलित बसेस रस्त्यावर आणून उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे. मात्र उत्पन्नवाढ, बसेस दुरुस्ती, ठेकेदाराचे बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन याबाबत व्यवस्थापक, लेखापाल, कार्यशाळा प्रमुख, वाहतूक विभागप्रमुख काहीच काम करत नाहीत. जर प्रवाशांचे हित धोक्यात येत असेल तर प्रशासनाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असे संतोष चव्हाण, मधुकर यशवंतराव, राजेंद्र दीक्षित, संजय पावशे या शिवसेना सदस्यांनी ठणकावले. सभापती सुभाष म्हस्के यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोपही सदस्यांनी केला. यावर येत्या चार दिवसांत सर्व वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावतील अशी स्पष्ट ग्वाही सु. रा. पवार यांनी दिली.

उत्पन्नावरही परिणाम
ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावत नसल्याचे प्रवाशांचे हाल होत आहे. शिवाय परिवहनचे उपन्नही घटत असून कार्यशाळेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
– संतोष चव्हाण, परिवहन सदस्य.