लाचखोरांवर ‘होलसेल’ ट्रॅप

2
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । ठाणे

जागेची कागदपत्रे देण्यापासून वाहन परवाना काढण्यासाठी लाच मागणाऱ्या तीन आरटीओ एजंट्सना ठाण्यात तर कल्याणात तलाठी व लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. या विविध प्रकरणात एकूण पाचजणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून त्यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ असलेल्या मर्फी आरटीओ कार्यालयाबाहेर दोघा तक्रारदाराकडून लर्निंग व पक्के लायसन्स काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या समीर जाधव (26), किशोर जैन (53), समीर काझी (34) या तिघा आरटीओ एजंटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यातील जाधव याला अडीच हजार तर जैन व काझी याला 1200 रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. तसेच तक्रारदाला कल्याण येथील जमिनीच्या फेरफारचे कागदपत्र माहिती अधिकारांतर्गत देण्यासाठी तीन हजारांची लाच लिपिकामार्फत घेणाऱ्या तलाठ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणात तलाठी शंकर साळवी(38) व लिपिक नितीन पाटील (35) या दोघांना अटक केली असून हे दोघेही कल्याण तहसील कार्यालयात कामाला होते.