लाच मागणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर

वीजचोरी प्रकरणात कारवाई न करता १५ हजारांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित शाखा कोंढाळीच्या साहाय्यक अभियंत्यावर नागपूरच्या अ‍ॅन्टिकरप्शन विभागाने गुरुवारी कारवाही कारवाई करून गुन्हा दाखल केला. कोहीनूर गोंविदराव ताजने (३७, विकासनगर, कोंढाळी ) असे आरोपीचे नाव आहे.

दिघोरी नागपूर येथील रहिवासी तक्रारकर्त्याची खापरी कोंढाळी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवर हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. यादरम्यान महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित शाखा कोंढाळीचे साहाय्यक इंजिनिअर कोहीनूर ताजने यांनी तक्रारकर्त्याच्या शेतात येऊन बांधकाम व इलेक्ट्रिक बोर्डाचे फोटो काढले. घरगुती विजेचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याबद्दल ६५ हजारांचा दंड होऊ शकतो, असे म्हणून ताजने यांनी तक्रारकर्त्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्याने याची तक्रार नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केले. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. यात अभियंता ताजने यांनी गुन्हा नोंद न करता पदाचा दुरुपयोग करून स्वत:च्या फायदा करून घेण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ताजनेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई नागपूर अ‍ॅन्टिकरप्शन विभागाच्या पीआय शुभांगी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.