पोलीस आयुक्तालयात पाचशे रुपयांची लाच

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पोलीस आयुक्तांकडून घर घेण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिक गंगाधर डहाळे यास आज सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीत लाच घेण्याची ही पहिलीच वेळ होय.

पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास नवीन घर खरेदी करावयाचे होते. त्यासाठी पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यावरून पोलीस कर्मचाऱ्याने परवानगीसाठी रीतसर अर्ज दिला होता. आस्थापना शाखेतील कनिष्ठ लिपिक गंगाधर नामदेव डहाळे याने शुक्रवारी परवानगीच्या अर्जाची फाईल पुटअप करण्यासाठी तसेच परवानगी मिळवून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. उपअधीक्षक बाळा कुंभार यांनी तक्रारीची शहानिशा केली असता गंगाधर डहाळे याने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

ठरल्याप्रमाणे उपअधीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, विजय बाह्मंदे, गोपाल बरंडवाल, सुनील पाटील, राजपूत आदींच्या पथकाने आज सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात सापळा रचला. आस्थापना शाखेत गंगाधर डहाळे याने पाचशे रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी झडप मारून त्यास अटक केली. पोलीस आयुक्तालयातील बाबू पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना छळ करीत असल्याचा अनेक तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.