महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

सामना प्रतिनिधी । लातूर

जिल्ह्यात दाखल झालेल्या पंचायतराज समितीसाठी एक हजार रुपये घेणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यात कितीजण अडकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूर तालूक्यातील मौजे बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी हिना कैसर पिता जमील अहेमद मोमीन (वय२८) रा. लातूर यांनी तक्रारदार याला एक हजार रूपये लाच मागितली होती. पंचायतराज समितीकडून होणाऱ्या लेखापरिक्षणासाठी म्हणून ही लाच मागण्यात आलेली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रक्कम पंचासमक्ष हिना कौसर जमिल अहेमद मोमीन यांनी स्वीकारली. त्याचवेळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले. पोलीस उपअधिक्षक माणिक बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा पोलीस निरीक्षक कुमार दराडे, महिला पोलीस निरीक्षक वर्षा दंडिमे व त्यांच्या पथकाने यशस्वी केला.

लातूर जिल्हा परिषदेच्या अब्रुची लक्तरेच या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहेत. ही रक्कम हिना कौसर जमिल अहेमद मोमीन यांनी कोणाच्या सांगण्यावरून गोळा केली. त्यांना अटक होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.