अतिक्रमण विभागाप्रमुख अभंगला लाच घेताना अटक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

महानगरपालिका प्रशासनच शहरातील अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचे उघड झाले आहे. बांधकाम साईटवरून जप्त केलेले साहित्य परत करून उर्वारित बांधकाम पुन्हा सुरू ठेवण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख छबुलाल अभंग आणि कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन दुबे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे मनपात खळबळ उडाली आहे.

बीड बायपास रोडवरील शहानगर भागात एका घराचे अवैध बांधकाम सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्याने अतिक्रमण विभागप्रमुख पदाचा तात्पुरता पदभार असलेले छबुलाल म्हतारजी अभंग यांनी धडक कारवाई करून साईटवरून बांधकामासाठी लागणारे साहित्य जप्त करून बांधकाम रोखण्याचे आदेश दिले होते. बांधकाम करणाऱ्याने छबुलाल अभंग यांची भेट घेऊन बांधकाम साहित्य परत देण्याची मागणी केली असता. अभंग यांनी साहित्य परत देण्यासाठी तसेच उर्वारित बांधकाम पुढे सुरू ठेवण्यासाठी ७५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीवरून उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या पथकाने तक्रारीची शहनिशा केली असता छबुलाल अभंग आणि दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे या दोघांनी तडजोड करून ५० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम सचिन दुबे यांच्याकडे देण्याचेही अभंग याने सांगितले होते. यावरून आज शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कार्यालयात वर्षाराणी पाटील यांच्या पथकातील नितीन देशमुख, विजय बाह्मंदे, रवींद्र देशमुख, गोपाल बरंडवाल, दिगंबर पाठक, संदीप चिंचोले आदींच्या पथकाने रचला होता. ठरल्याप्रमाणे सचिन दुबे याने ५० हजार लाचेची रक्कम हातात घेताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी झडप मारून सचिन यास अटक केली. त्यानंतर केबिनमधून छबुलाल अभंग यांनाही ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.