चार हजाराची लाच स्वीकारताना कारकुन अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

6

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकुन डी.पी.पवळे यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकुन रंगेहात पकडले. या प्रकरणी अहमदपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू होती.

वादग्रस्त जमिनीचा दुसऱ्याच्या नावे मंजूर होऊन आलेला मावेजा प्रकरणातील अर्जावर निकाल देवून अंतिम निर्णयासाठी प्रकरण दिवाणी न्यायालयात वर्ग करण्यासाठी पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती चार हजार रूपये घेण्याचे अव्वल कारकुन डी.पी.पवळे यांनी मान्य करून सदर लाचेची रक्कम दुपारी २ वाजता भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात देण्याचे ठरले. त्याप्रमाणे पोलीस अधिक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे, पो.नि. वर्षा दंडीमे, पो.नि. कुमार दराडे, लालुप्रवि लातूर यांनी आखलेल्या सापळ्यात आरोपी पवळे यास अटक केली. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पो.हे.कॉ. संजय पस्तापूरे, व्यंकट पडीले, पो.ना. लक्ष्मीकांत देशमुख, पो.कॉ. मोहन सुरवसे, नाना भोंग, शैलेश सुडे, विष्णू गुंडरे, सचिन धारेकर, दत्ता विभूते, प्रदीप स्वामी,शिवकांता शेळके व चालक पो.ना. महाजन यांनी परिश्रम घेतले असुन पुढील तपास पो.नि. कुमार दराडे हे करीत आहेत.