अपघात टाळता येतील

प्रशांत येरम,[email protected]

कोकणच्या वाटेवर प्रवास करताना अपघाताचे भय मनाला ग्रासत असते… बऱयाच गोष्टी चालकाच्या हाती असल्या तरी सामान्य माणसांनी थोडी काळजी घेतली तर बऱयाच गोष्टी साध्या होतील.

गेल्या काही दिवसांत अपघाताच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. कुठे वाहने एकमेकांवर आदळली तर कुठे वाहन दरीत कोसळले आणि मग सुरू होते चर्चा… चर्चा… आणि चर्चा… पण अपघात होऊच नये म्हणून जी काही जागरूकता हवी ती कुणाकडे असते. तर हा संशोधनाचा विषय ठरेल! आपण स्वतः जरी रहदारीचे नियम अगदी काटेकोरपणे पाळत असलो तरी वेळ काही सांगून येत नाही अशीही वाक्ये मग आपसूकपणे चर्चेला येतात.

रस्त्यावर होणाऱया अपघाताला नक्की जबाबदार कोण… तर जितका जबाबदार चालक असतो तितकाच त्याच्यासोबत प्रवास करणाराही असतो. वाहनचालकाला जेव्हा वाहन चालवण्यासाठी दिले जाते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे वा माहिती असणे आवश्यक असते. यातला प्रमुख मुद्दा आहे तो शिक्षणाचा. अर्थात वाहन चालवण्यासह या चालकाच्या शिक्षणाचाही विचार व्हायला हवा. ज्याबाबत आपण कधीच काही बोलत नाही.

वाहनचालकाला परवाना देताना नक्की काय काय शिकवले जाते? शिस्त आणि नियमांचे तो कितपत पालन करतो. स्वतःसह तो प्रवाशांच्या जिवाची काळजी घेतो का? रात्रीचा प्रवास करताना तो पुरेशी सावधानता बाळगतो का? मालवाहू वाहन असेल तर प्रमाणापेक्षा सामान वाहनात भरतो का? वाहन चालवताना नियमांचे पालन करतो का? असे अनेक प्रश्न आहेत. पण वाहनचालक याबाबत कधीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत… आणि मग परिणाम अपघात…

अपघात टाळण्यासाठी चालकाप्रमाणे वाहनातील प्रवाशांनीही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण जर खासगी चारचाकी वाहनाने प्रवास करत असाल आणि चालकाच्या बाजूला बसला आहात तर चालकाचे लक्ष आपल्याकडे वेधले जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्याला वा चालकाला डुलकी येत असेल तर तसे चालकाच्या निदर्शनास आणून द्या. विनाकारण वाहनात मोठय़ा आवाजात गाणी लावू नका. तसेच मोठय़ाने हास्यविनोदही करणे टाळा. चालकाच्या मागच्या आसनावर बसलो आहोत म्हणून चालकाकडे दुर्लक्ष करणे टाळा. तो काही चुकत असेल तर वेळीच ते त्याच्या निदर्शनास आणून द्या.

वरील सर्व काळजी जरी आपण घेत असलो तरी ज्या रस्त्यावरून आपण वाहन चालवत आहोत त्याची इत्थंभूत माहिती असणेही खूप गरजेचे आहे. शिवाय निवडलेल्या मार्गावरून प्रवास करावा. अचानकपणे चालकाला मार्गबदल करण्यास सांगितले तर त्याचाही गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहन चालवताना ते कुठे आणि कसे थांबवावे, ते थांबवताना काय काळजी घ्यावी याचेही पालन होणे आवश्यक आहे. पुढे चालकासह बसणाऱया प्रवाशांनी तर याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. वाहन चालवताना रस्त्यावरील दुभाजक, मार्गदर्शक फलक, लेन, वेगमर्यादा, सुरक्षेचे नियम यांची काळजी घेतली तर आपण अपघात टाळू शकतो.

हेही महत्त्वाचे…

दुचाकी वा चारचाकी चालवताना मीच शहाणा या आविर्भावात वाहन चालवू नका.  रस्त्यावरून वाहन चालण्याचा पहिला अधिकार आपलाच असे वाहनचालकांनी समजू नये. वाहनातील प्रवासी काय मानसिकतेचे आहेत याचा विचार चालकाने करावा.  प्रवाशांच्या जिवाची काळजी प्रथम करावी.  मार्गिका बदलताना मागील वा पुढील वाहनाला कळेल या पद्धतीचा वापर करावा.  वाहनांच्या सर्व दिव्यांची तपासणी वरचेवर करावी. (मुख्यतः रात्रीचा प्रवास करताना)  वाहनांचे मेटेनन्स वेळेवरच करावे. आपल्या वाहनात अकस्मात दोष उद्भवणार नाहीत; जसे ब्रेक न लागणे, इंधन टाकी गळणे, दरवाजा अचानक उघडल्याने अपघात होणे आदींची काळजी घेणे आवश्यक आहे. सहप्रवासी जर लहान मूल असेल तर त्यांची विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यांना पुढच्या आसनावर बसवू नये. वाहनातील एअर बॅग्ज वरचेवर तपासून पाहाव्यात.  लेन आणि वेगमर्यादा पाळणे गरजेचे आहे.