कसारा घाटाजवळ विचित्र अपघात; दोनजण गंभीर जखमी

11


सामना प्रतिनिधी । कसारा 

नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा फाट्यानजीक नाशिकहून भरधाव येणारा कंटेनर वळणावर उलटला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी बचावकार्य करत असताना दुसरा एक भरधाव कंटेनर एका आयशर टेम्पोला धडक देत त्याच ठिकाणी उलटला. या विचित्र अपघातात जुबेर अहेमद (वय 22, रा.अलाहाबाद) आणि मोहम्मद फिरोज (वय 25, रा.अमेठी) हे दोनजण गंभीर जखमी झाले.अपघातात जखमी झालेल्यांना आपत्ती व्यवस्थापन, गस्त पथक आणि कसारा पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहिला अपघात झाल्यानंतर बचावकार्यासाठी आलेले आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य तसेच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये,पोलीस कर्मचारी इखनकर, बिडवाल,कोथे,चौधरी,तिडके,तसेच रुग्णवाहिका कर्मचारी राजेश मोरे, जितु आहेर,विजय वाटेकर व पेट्रोलिंग पथक आणि एका स्विफ्ट कारमधील प्रवासी दुसऱ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पहिल्या अपघातातील जखमी कंटेनर चालकाला कॅबिनमधून बाहेर काढत असताना दुसरा भरधाव कंटेनर तेथेच उलटला. मात्र, प्रसंगावधान राखत हे सर्व रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पळाल्याने थोडक्यात बचावले.

आपली प्रतिक्रिया द्या