मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ अपघात; एक ठार, चार जखमी

69

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ वॅगनर कार व अॅक्टिव्हा यांच्यात झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना उपचारासाठी मुंबईला हलविले आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून वॅगनर कार भरधाव वेगाने माणगावकडे येत होती. अश्विनी काळे (31) व माधुरी काळे (23) या नणंद भावजया अॅक्टिव्हाने इंदापूरला निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून येणाऱ्या वॅगनर कारची धडक मोटारसायकलला बसली. या अपघातात अश्विनी काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर माधुरी काळे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. अपघातानंतर वॅगनर कार उलटून रस्त्याबाहेर गेली. कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. माणगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या