हळदी समारंभातून परतताना भीषण अपघात, पाच तरुण ठार

सामना प्रतिनिधी । पालघर

मित्राच्या हळदी समारंभावरून घरी परतणाऱया पालघरमधील पाच तरुणांवर आज पहाटे काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव फोक्स वॅगन कार वडाच्या झाडावर जाऊन आदळल्याने ही भीषण दुर्घटना घडली असून हे पाचही तरुण जागीच ठार झाले. या घटनेने पालघर शहरावर शोककळा पसरली आहे.

पालघर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडराई गावात आपल्या मित्राच्या हळदी समारंभातून हे सर्व तरुण आपल्या घरी परतत होते. त्यावेळी केळवा-पालघर रोडवरील पाटीलवाडी येथे पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान डुलकी लागल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून त्यामधील पाचही तरुण जागीच ठार झाले. पहाटे पाच वाजता या मार्गावरून जाणाऱया एका वाहनचालकाला ही घटना लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

मृतांची नावे –
निकेश मोहन तामोरे (२५, रा. तारापूर घिकली)
दीपेश रघुनाथ पागधरे (२५, रा. सातपाटी)
किराज अर्जुन केताळ (२५, रा.पालघर)
किरण परशुराम (३०, रा. कडराई)
संतोष कामन बहिराम (३७, रा. खाणपाडा)