नाशकात गोदावरीमध्ये उडी मारली, सापडला मात्र उत्तर प्रदेशात!

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक तुरुंगात नेत असताना त्याने संधी साधली. व्हॅनमध्ये शेजारी बसलेल्या पोलिसाला त्याने धक्का दिला आणि व्हॅनच्या खिडकीतून सुमारे  ६० फूट उंचीवरून गोदावरी नदीत उडी मारली. पोलिसांना गुंगारा देत हत्येच्या गुह्यातील सतीश महिपाल वाल्मीकी ऊर्फ राजा याने पळ काढला. पण त्याने आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केले आणि पोलिसांच्या रडारवर आला. भोईवाडा पोलिसांनी त्याला पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांनी उत्तर प्रदेश येथून शोधून काढले.

कांदिवली येथे २००९ साली सतीशने अपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने २०१० साली जन्मठेप सुनावली. यानंतर राजाला नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातील कैद्यांना नियमित रुग्णालयात तपासणीसाठी नेले जाते हे सतीश याला माहीत होते. मलाही गुडघेदुखी होत असल्याची तक्रार सतीशने सप्टेंबर २०१२ रोजी केली. इतर १५ गुन्हेगारांसोबत पोलीस व्हॅनमधून नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याला नेण्यात आले. परतत असताना व्हॅनमध्ये पोलिसाला धक्का मारून सतीशने पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. सतीश पळाल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक आणि मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. सतीशचे वडील केईएम रुग्णालयात कामाला होते आणि दादर-नायगाव येथे राहत होते, मात्र या ठिकाणी तो येतच नव्हता. सतीशने मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक केल्याने यावरून पोलिसांना त्याचा मोबाईल नंबर सापडला. याआधारे भोईवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप तांबे, हवालदार संभाजी वायकर, राज कंठे, देवीदास साबळे यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील बराना या छोटय़ाशा गावात सापळा रचून सतीशला पकडले.

गावकऱयांची धक्काबुक्की

सतीश बराना गावातील भंगीवाडी येथे असल्याचे समजताच भोईवाडा पोलिसांच्या पथकाने रविवारी त्याला सापळा लावून पकडला. सतीशला पोलिसांनी पकडले हे कळताच गावकरी जमा झाले. त्यांनी सतीशला मुंबईत आणण्यास विरोध करीत पोलिसांना धक्काबुक्की केली, पण पोलिसांनी त्याला सोडले नाही आणि सुरक्षित मुंबईत आणले. सतीशला नाशिक मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाच्या हवाली केले जाणार आहे.