स्टर्लिंग बायोटेक कर्जघोटाळा; फरार आरोपी हितेश पटेलला अल्बानियातून अटक

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक समूहाद्वारे 8,100 कोटी रुपयांचा बँक कर्जघोटाळा करून परदेशात पळून गेलेला आरोपी हितेश पटेलला युरोपातील अल्बानियामधून अटक करण्यात आली आहे. पटेलच्या अटकेमुळे आणखी एका फरार आर्थिक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) यश आले आहे.

पटेलविरोधात ईडीने इंटरपोलकडून 11 मार्चला नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अल्बानियातील अधिकाऱ्यांनी पटेलला बुधवारी अल्बानियाची राजधानी तिराना येथून अटक केली. ईडीला याबाबत कळवण्यात आले असून ईडीचे अधिकारी पटेलच्या प्रत्यार्पणासाठी लवकरच तेथे रवाना होणार आहेत. स्टर्लिंग समूहातर्फे झालेल्या या कर्जघोटाळ्यातील पटेल हा एक आरोपी असून या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन संदेसरा व नितीन संदेसरा यांचा तो मेहुणा आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संदेसरा बंधूही अल्बानियात असल्याचा संशय ईडीला आहे. या दोघांच्या प्रत्यार्पणासाठी अल्बानियाला विनंती करण्याची परवानगी दिल्ली न्यायालयाने ईडीला नुकतीच दिली आहे.

स्टर्लिंग समूहाने आंध्र बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांकडून 8,100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून यातील किमान पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज हे बुडीत ठरले आहे. ही कर्जे बनावट कंपन्यांना देण्यात आली. या कंपन्यांसाठी तोतया संचालक मिळवून देण्याचे काम पटेलने केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणी पाच आरोपपत्र दाखल केली असून आरोपींची एकूण 4,710 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.