पाथर्डी बलात्कारप्रकरणातील आरोपी पावसाचा फायदा घेत बेड्यांसह फरार

सामना ऑनलाईन । नगर

राज्याच्या अन्य भागांप्रमाणे बुधवारी नगरलाही पावसाने झोडपून काढलं होतं. या पावसाचा आणि पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा फायदा घेत पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईन शेख बेड्यांसह फरार झाला आहे. याच वर्षी जुलै महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी नगर जिल्हा सत्र न्यायालयात होती. सुनावणी संपवून परतत असताना पोलिसांची गाडी कल्याण-विशाखापट्टणम मार्गावरील मेहकरी गावाजवळ वाहतूक कोंडीत अडकली. मेहकरी पुलावरुन नदीचं पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. याचवेळी शेखने लघुशंकेला जायचा बहाणा केला. सोबत उतरलेल्या पोलीस हवालदाराच्या हाताला हिसडा देत शेख हातातील बेड्यांसह पळून गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

२१ जुलै २०१७ रोजी नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मोईन शेख याने एका शाळकरी मुलीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बलात्कार केला होता. ही घटना समजल्यानंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. या बलात्काऱ्याला पकडण्याची मागणी करत मोठं आंदोलन देखील झालं होतं. हा आरोपी फरार झाल्याने या ग्रामस्थांमध्ये पुन्हा संतापाची लाट पसरली आहे.