रामेश्वर डाळपस्वारीचा अनोखा होडी प्रवास

सामना प्रतिनिधी । मालवण

आचरा येथील इनामदार श्री देवी रामेश्वराची ऐतिहासिक त्रैवार्षिक डाळपस्वारी जनतेची गाऱ्हाणी आणि ओट्या स्वीकारत बुधवारी बोटीतून जामडूल बेटाकडे रवाना झाली. पिरावाडी येथील हजरत पीर इब्राहिम खलील या पिरला रामेश्वर भेटीचा अनोखा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वधर्म समभाव जोपासणाऱ्या या ६ दिवसीय सोहळ्याची शुक्रवार ९ रोजी सांगता होणार आहे.

श्रींच्या स्वारीचे स्वागत पिरावाडीवासीयांनी मोठ्या धुमधडाक्यात केले. स्वारी होडीतून आणण्यासाठी पिरावाडीतील मच्छीमार बांधवानी सहकार्य केले. येथे काही काळ विसावल्यानंतर स्वारी हिर्लेवाडी येथील शिवापूरच्या बांधावरून माडाच्या झावळीच्या चुडीच्या प्रकाशातून देव तरंगानी त्वेषाने धावत जाऊन भक्तांना भेट दिली. ठिकठिकाणची देव तरंगाची आनंदी झुलवे नृत्ये, ही दर्शनीय असतात. राञी उशीरा ब्राम्हणदेव मंदिरात श्रींची स्वारी विश्रांतीसाठी थांबली. गुरूवारी पहाटे स्वारी नागझरी येथील गिरवळी ( पूर्वी आकारी) मंदिरात दाखल होणार आहे. गुरूवारी स्वारी तिथेच विश्रांतीसाठी थांबणार आहे. शुक्रवार ९ फेब्रुवारीला गिरावळी मंदिरातून सकाळी आचरा बाजारपेठमार्गे तिठा श्री ब्राम्हण मंदिर, नागोचीवाडी येथे जाणार आहे. तेथून पारवाडी मार्गे ब्राम्हणदेव मंदिरात रात्री पोहचणार आहे. मध्यरात्री पुन्हा श्री रामेश्वर मंदिर येथे परतणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून गांगेश्वर मंदिरात थांबणार आहे.

आचरा येथील चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या नयनरम्य जामडूल बेटावर जेरॉन फ़र्नांडिस व मोतेस फ़र्नांडिस यांच्याकडून सर्व भाविकांच्या महाप्रसादाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच रात्री भाविकांना हिर्लेवाडी मंडळाकडून रात्रौच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पूर्वीच्या काळी गुळ, पाणी लिंबू सरबताच्या सोयीने पार पडणारी डाळपस्वारी आज हजारो भाविकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठून संपन्न होत आहे. श्रींची स्वारी ज्या ज्या मार्गाने जाते तो सगळा मार्ग लखलखीत करून त्या संपूर्ण मार्गाला आकर्षक रोषणाईने सजविले आहे.