अकार विठ्ठल अक्षर विठ्ठल

अच्युत पालव,[email protected]

एक सूर ।

एक नाद ।।

एक रंग ।

एक ढंग ।।

एक आस ।

एक भास ।।

एक ध्येय ।

एक स्फूर्ती ।।

एक नाम ।

विठ्ठल नाम ।।

नाम नाम । नामाचा गजर ।।

प्रत्येकाच्या मनातला… लहानांपासून मोठय़ापर्यंत… कलाकार असो वा सामान्य वारकरी… सगळय़ांचाच असलेला तो विठ्ठल… शाळेतल्या अभ्यासातून ते आजच्या घडीपर्यंत विठ्ठलभक्तीचा महिमा अभंगातून, सिनेमातून, नाटकातून कीर्तनातून ऐकला होता. मजा म्हणून दिंडीला जायचो… विठ्ठल नामाचा गजर करायचो, पण का व कशासाठी याची जाणीव नव्हती. पुढे सुलेखनाला खऱया अर्थाने सुरुवात झाली… पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवलं आणि बहुतेक विठ्ठलानेसुद्धा तथास्तू म्हटलं असणार…तेव्हापासून अक्षरांचा रंग आणि ढंग बदलला… अक्षरं विठ्ठलसारखी उभी लिहिली आणि मनी अक्षर विठ्ठल दिसला अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली.

‘जे पाहिले ते लिहिले’ याच भावनेतून मग सुरू झाला ‘विठ्ठल नामाचा अक्षर सोहळा’. त्याला साथ मिळाली टाळांची… मृदुंगाची… चिपळय़ांची… ढोलकीची आणि संत ज्ञानदेव, संत तुकाराम यांनी रचलेल्या अभंगवाणीची… मनात भक्तीची पॅलेट तयार झाली आणि त्याच नादातून विठ्ठलाची असंख्य रूपं बाहेर पडू लागली… मग दरवर्षी शशी व्यासांचा ‘बोलावा विठ्ठल’… दरवर्षी नवीन विठ्ठल… माझ्यासाठी खरं तर पर्वणी होतीच, पण आव्हानही होतं. नाद कानात आणि मनात असेल तर चित्र व्हायला वेळ लागत नाही याची प्रचीती आली होती. मग पेपर असो वा कॅनव्हास आपोआप तो प्रगट होत असे. कदाचित मी निमित्तमात्र असेन असं मी मानतो. आजच्या काळात एकरूप होऊन काम करणं तसं कठीण असलं तरी सुलेखनाच्या भाषेत एका सरळ रेषेत, एका सुरात आणि एका तालात कुणाचाही आदेश नसताना मैलोनमैल चालत जेव्हा वारकरी पंढरपूरला पोहोचतात तेव्हा माझ्या मनात एक सरळ रेषा तयार होते… आणि पुढे वर्षानुवर्षांसाठी कायम राहते… माझ्या आणि इतरांच्या मनातही….विठ्ठल । विठ्ठल । विठ्ठल ।