‘ती’ कोटय़वधी रुपयांची पावडर घातक; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

4

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षी पकडलेल्या फेंटानील या घातक ड्रग्जचा रासायनिक अहवाल आला असून त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी पकडलेला तो रासायनिक पदार्थ अत्यंत घातक असून फेंटानील हा ड्रग्ज बनविण्यासाठी याच रासायनिक पदार्थाचा मुख्य करून वापर होतो. महाग आणि तितकेच घातक असलेल्या या ड्रग्जची परदेशात मोठय़ा प्रमाणात नशा केली जाते आणि त्यात आतापर्यंत हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत.

अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने गेल्या वर्षी वाकोला येथे एका कारमधून चार ड्रम भरून आणलेला 100 किलो वजनाचा व एक हजार कोटींचा फेंटानील ड्रग्ज पकडला होता. त्यानंतर तो ड्रग्ज तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला होता. आता प्रयोगशाळेचा अहवाल आला असून त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी पकडलेला तो एनडीपीएस कायद्यानुसार घातक व बंदी असलेला नियंत्रित रासायनिक पदार्थ असून याचाच प्रामुख्याने फेंटानील ड्रग्ज बनविण्यासाठी वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पकडलेल्या 100 किलो नियंत्रित रासायनिक पदार्थापासून 3 कोटी 80 लाख फेंटानील गोळय़ा बनल्या असत्या आणि त्याची किंमत 6 हजार 900 कोटी इतकी असती असे तपासातून समोर आले आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने केलेली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

हजारो नागरिकांचे प्राण वाचले

एअर कार्गोने 100 किलो नियंत्रित रासायनिक पदार्थ फेंटानील बनविण्यासाठी मेक्सिकोला पाठविण्यात येणार होता, पण उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष भालेकर व त्यांच्या पथकाने वाकोल्यातच तो ड्रग्जचा साठा पडला होता. गुजरातहून आणलेला तो ड्रग्ज मेक्सिकोला पाठविण्यात येणार होता. तेथे या ड्रग्जपासून फेंटानीलच्या गोळय़ा बनविण्यात येणार होत्या. मेक्सिको, अमेरिकेत फेंटानील ड्रग्जची सर्वाधिक नशा केली जाते.

अमेरिकेपेक्षा मोठी कारवाई

यापूर्वी अमेरिकेमध्ये 50 किलो फेंटानील ड्रग्ज पकडले होते. त्या नियंत्रित रासायनिक पदार्थापासून 1 कोटी 90 लाख इतक्या फेंटानीलच्या गोळय़ा बनल्या असत्या. त्याची किंमत 57 कोटी डॉलर इतकी असती. या तुलनेत मुंबईत पकडलेल्या व फेंटानील बनविण्यासाठी लागणाऱ्या नियंत्रित पदार्थाची हिंदुस्थानी किंमत 1140 लाख डॉलर इतकी असती असे तपासातून समोर आले आहे.