नगरमध्ये गणेशोत्सवासाठी उभारला जाणारा मंडप महापालिकेने तोडला, शिवसेना आक्रमक

nagar-ganesh-pandal-issue

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये गणपतीच्या मंडप उभारणीचे काम सुरू असतानाच आज सकाळी महानगरपालिकेच्या प्रशासनाने मंडप जेसीबीच्या साह्याने तोडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले असून तक्रार देण्यात आली आहे.

महापालिकेचे अधिकारी पोलीस फौजफाटा त्या ठिकाणी घेऊन आले आणि मंडप पाडला. या मंडळाची चाळीस वर्षांची परंपरा आहे. मंडप उभारल्यानंतर देखील त्याच्या बाजूने जाऊ शकतात इतका मोठा रस्ता असताना सुद्धा त्या ठिकाणी येऊन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान केले, अशी माहिती अनिल राठोड यांनी दिली. आज दुपारी बारा वाजल्यापासून नेताजी सुभाष चौकांमध्ये धार्मिक भावना दु:खावल्याबद्दल उपोषण सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वास्तविक पाहता प्रशासनाने मंडप उभारण्याची परवानगी अगोदर देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अगोदर परवानगी दिली नाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करताना मंडळ उभारलेला दोन ते तीन आठवडे लागतात, याची सर्व माहिती प्रशासनाला असते. वास्तविक पाहता या मंडळाचा मंडप कोणत्याही रस्त्याला अडथळा ठरत नसताना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर मंडप पाडला आहे. प्रशासनाला आम्ही निश्चितपणे जाब विचारला, मात्र त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत, असेही राठोड म्हणाले.

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते सभागृहनेते गणेश कवडे माजी शहरप्रमुख संभाजी कदम नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, सुरेश तिवारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी येथील कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.