केवळ वचनं नको, थेट कारवाई हवी; हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावलं

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदवर कारवाईच्या बातम्यानंतर हिंदुस्तानने पाकिस्तानला सुनावले आहे की आम्ही केवळ तोंडी माहितीवर, वचनांवर विश्वास ठेवणार नाही. पाकिस्तानने हाफिज सईद विरुद्ध प्रत्यक्ष कारवाई केल्याचे दाखवा, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी गुरुवारी सांगितले.

पाकिस्तानच्या एका मंत्र्याने सरकारकडे हाफिज सईद विरोधात पुरावे मागितले आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता विकास स्वरुप यांनी सविस्तर उत्तर दिले. मुंबई हल्ल्याचा कट हा पाकिस्तानात रचण्यात आला होता. दहशतवादी तेथूनच हिंदुस्थानात आले. त्यांना पाकिस्तानचेच पाठबळ होते. खुद्द हाफिज सईदने मुंबईवर हल्ल्याचे वक्तव्य केले आहे. तरीही पाकिस्तानला पुरावे हवे असतील तर त्यांच्याजवळ पुरावे पुष्कळ आहेत मात्र राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, असे विकास स्वरुप म्हणाले.

पाकिस्तानने केलेली कारवाई देशहितासाठी करण्यात आली आहे, असे पाकिस्तानच्या सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र पाकिस्तानने दहशतवादाला साथ देणे पूर्ण बंद केल्याशिवाय हिंदुस्थान कोणत्याही बोलणीसाठी तयार नाही, असे स्वरुप यांनी स्पष्ट केले.