अनधिकृत होर्डींगवर जाहीरातबाजी करणार्‍यांवर कारवाईचा बडगा

1

सामना ऑनलाईन, पुणे

शहरातील अनधिकृत होर्डींगला आळा घालण्यासाठी यापुढे त्यावर जाहिरातबाजी करणार्‍यांवरच कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे जाहिरातबाजी करताना संबंधित व्यक्तीने, संस्थेने किंवा कंपनीने होर्डींगसंबंधी अधिकृत असल्याची खात्री करूनच जाहीरात करावी लागणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ नुसार शहरातील होर्डींग, जाहिरात, फ्लेक्स लावण्यास परवानगी दिली जाते. यातून पालिकेला उत्पन्नही मिळते. मात्र मागील काही वर्षापासून शहरात अनधिकृत होर्डींग आणि फ्लेक्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असून पालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. त्यातच मंगळवार पेठ येथील शाहीर अमर शेख चौकात अनधिकृत होर्डींग काढताना कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला, अनेक जण जखमी झाले.

या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सध्या अनधिकृत होर्डींग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र आगामी काळात अनधिकृत होर्डींग आणि फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डींग मालकासह होर्डींगवर जाहिरातबाजी करणार्‍या व्यक्तीवर, संस्थेवर आणि कंपनीवर कारवाई करण्याचा आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील अधिकृत फलकांवर पालिकेचा सांकेतिक क्रमांक टाकण्यात येते. अधिकृत जाहिरात फलक आणि होर्डींगची पूर्ण माहिती   www.punecorporation.org संकेत स्थळावर पहायला मिळते. त्यामुळे जाहीरात करणार्‍या व्यक्तीने, संस्थेने किंवा कंपनीने या सर्व गोष्टींची शहानिशा करूनच जाहिरातबाजी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेले स्ट्रक्चर हे नियमानुसार नसल्याने त्यांच्यावर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहेत.