‘सामना’चा दणका; बंडगरवाडीत वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट जप्त

सामना प्रतिनिधी । भिगवण

उजनी जलाशयातील वाळू माफियांचा कर्दनकाळ ठरलेले इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्याने वाळू माफियांनी आपला मोर्चा उजनीतील काळ्या सोन्याकडे वळवत नदीमध्ये असणाऱ्या वाळूवर डल्ला मारण्याचा धडाका चालूच ठेवल्याचे वृत्त दै. ‘सामना’च्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये प्रसिद्ध होताच बारामतीचे प्रांतअधिकारी व भिगवण पोलीसांनी केलेल्या कारवाईने वाळू सम्राटांची दाणादाण उडाली. बंडगरवाडीत वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट जप्त करण्यात आली.

भिगवणजवळील बंडगरवाडी व कुंभारगांव याठिकाणी रात्रीच्या वेळी वाळूमाफियांनी शासनाचा महसूल बुडवून अवैधरीत्या वाळू उपसण्याचा धंदा चालू ठेवला होता. फायबर बोटींच्या सहाय्याने हे माफिया गेल्या आठ दिवसांपासून वाळू उपसत होते. सदरचे वृत्त ऑनलाईन सामनाला प्रसिद्ध होताच बारामतीचे प्रांतअधिकारी व भिगवण महसूल पथक, भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नीलकंठ राठोड यांच्या पथकाने धडक कारवाई केली. यामध्ये एक फायबर बोट व वाळू वाहतूक करणारी ट्रक जप्त करण्यात आला. एकूण साडेनऊ लाखांचा दंड सबंधितांना ठोठावला आहे. याप्रकरणी इंदापूर महसूल विभागाने शंकर बोंद्रे रा. केगांव ता. करमाळा, जि. सोलापूर यांस यांत्रिकी बोट वापरल्याबद्दल साडेसात लाखांचा तर नितीन ज्ञानोबा साळुंके रा. जवळा ता. सांगोला, जि. सोलापूर यांना अवैधरीत्या वाळू उपसा करण्यात येणाऱ्या बोटीसाठी ट्रकचा वापर केल्याबद्दल दोन लाखांचा दंड करण्यात आला.

प्रांतअधिकारी हेमंत निकम यांच्याबरोबर भिगवणचे मंडल अधिकारी मकरंद तांबडे, तलाठी गाडेकर, भारती व पोलीस कर्मचारी यांनी उजनी जलाशयालगत असणाऱ्या कुंभारगांव, बंडगरवाडी याठिकाणी छापा टाकला रात्री अकराच्या सुमारास झालेल्या प्रकारामुळे वाळूमाफियांनी चांगलीच धांदल उडाली. आपल्या बोटी वाचविण्यासाठी वाळू माफियांनी कसरत केली. कारवाईचे पथक आले असता अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांनी पळ काढला. वाळू माफियांच्या आलिशान गाड्यांची पोलिसांनी हवा सोडल्याने त्यांना रात्र नदीकाठावर काढावी लागली. या महसूल व पोलीस पथकाच्या धडक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले असून यामध्ये सातत्य राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.