पवईतील बेकायदा बांधकामप्रकरणी ‘एल ऍण्ड टी’वर कारवाई होणार

36

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल ऍण्ड टी कंपनीने उद्योग उभारण्यासाठी दिलेल्या जागेचे बेकायदेशीररीत्या निवासीमध्ये रूपांतर केले. मौजे पासपोली तसेच तुंगा येथील या जागेवर २२ मजली १० निवासी इमारतींचे टॉवर उभारण्यात आले. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली असता याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

एल ऍण्ड टीने पवई येथे केलेल्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी जिल्हाधिकारी तसेच महापालिकेने ५ फेबुवारी २०१७ रोजी अहवाल सादर केला. याप्रकरणी अहवालांची तपासणी झाल्यानंतर यावर भूखंडाच्या निवासी वापराबाबतचे अधिमूल्य वसूल करणे तसेच महापालिकेकडे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे व एल ऍण्ड टीने अधिनियमातील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना १६ फेब्रुवारी रोजी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या