शाळा बुडवून न्यायालयात हजेरी लावणाऱ्या शिक्षकांना शिक्षा, दोन दिवसांचा खाडा लागणार

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई बँकेविरोधात सुरू असलेल्या खटल्यासाठी शाळा बुडवून न्यायालयात हजेरी लावणाऱ्या शिक्षकांना शिक्षा झाली आहे. २७ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवशी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून न्यायालयात आलेल्या शिक्षकांची सुट्टी नामंजूर करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून काढून ते मुंबई बँकेतून करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला, पण या निर्णयाला शिक्षकांनी विरोध करून न्यायालयात याचिका दाखल केली होती. २७ आणि २९ सप्टेंबरच्या दिवशी बहुसंख्य शिक्षक ग्रुप करून सुनावणीसाठी आले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. याची न्यायमूर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे यांनी गंभीर दखल घेतली. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान करून न्यायालयात येण्याची काहीच गरज नव्हती, असे न्यायमूर्तींनी नमूद केले आहे. तसेच राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने अशा शिक्षकांची सुट्टी नामंजूर करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.