चमचमीत शाकाहार

12

अभिनेते आशीर्वाद मराठे. खाणं आणि खिलंवणं दोन्ही आवडीचं.

  • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? : खाणं म्हणजे पोट भरणे
  • खायला काय आवडतं? : शाकाहारी आणि चमचमीत खायला आवडतं. वरण-भात त्यावर तूप आणि बटाटावडा हे माझे फेव्हरेट पदार्थ.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? : फिटनेसची काळजी घेण्यासाठी भरपूर चालतो, पण खाणं सोडत नाही.
  • आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? : तीन-चार दिवस तरी बाहेर खाल्लं जातं, पण तेही कामाच्या स्वरुपावर अवलंबून असतं. तरीही बऱ्यापैकी बाहेरचं खाणं होतं.
  • कोणत्या हॉटेलमध्ये जाता? : ठराविक नाही. तरीही शक्यतो जिथे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात तिथे जायला आवडतं. पहिलं प्राध्यान्य आपल्याकडच्या पदार्थांसाठीच असतो. ते नसेल तर पंजाबी खायचं.
  • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? : मोजकंच खातो. प्रयोगावेळी शक्यतो वरण-भात खातो, कारण तो सगळीकडे मिळतो. मांसाहार करत नाही, त्यामुळे साधं जेवण जेवतो. प्रयोगानंतर जेवतो.
  • नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आवडलेला खास पदार्थ ? : हल्लीच काही दिवसांपूर्वी इंदूरला जाऊन आलो. तिथली खाऊ गल्ली प्रसिद्ध आहे. ‘कोकोनट क्रश’ हा तिथला पदार्थ मला विशेष आवडला.
  • स्ट्रिट फूड आवडतं का? : सहसा खात नाही, कारण जे खातो ते चांगल्या हॉटेलमध्येच खातो. अगदी इलाज नसेल तर पाणीपुरी खातो.
  • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? :  भरली वांगी, वांग्याचं भरीत-भाकरी, पावभाजी हे पदार्थ माझी पत्नी उत्तम करते.

व्हेज कटलेट

गाजर, बीट किसून घ्यायचे. उकडलेला बटाटा त्यामध्ये मिक्स करायचा. त्यानंतर मटारचे दाणे, फरसबी, कांदा, बारीक चिरलेला फ्लॉवर, आलं-लसूण, मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण एकजीव करावं. त्याचे बदामी, गोल आवडीच्या आकारानुसार कटलेट करावेत. रव्यात घोळवून तव्यावर तळावेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावेत.