एकाच नाटकात दहा भूमिका

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिगंबर नाईक एक हरहुन्नरी कलाकार नवरी छळे नवऱयाला या नव्या नाटकात त्यांनी १० व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

प्रेम, लग्न आणि नंतर संसार… जीवनात प्रत्येकाला या घटनांना समोर जावं लागतं… मात्र लग्न संस्थेवर विश्वास नसलेली आजची तरुणाई याचा कसा विचार करते. यावर निरागस मनोरंजनाद्वारे भाष्य करणारं…‘नवरी छळे नवऱयाला’ हे हलकंफुलकं नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे आपल्या कसदार अभिनयाने रंगमंचासह चित्रपट, मालिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा दिगंबर नाईक या अभिनेत्याने या नाटकात वेगवेगळ्या प्रकारच्या दहा व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. यातील प्रत्येक पात्राची भाषा आणि देहबोलीमध्येही वैविध्य आहे. याविषयी तो सांगतो, भोजपुरी, कर्नाटकी, वऱहाडी, ब्राह्मणी, आग्री, मालवणी, घाटावरची भाषा, दाणाकोटी, सिंधी अशा अनेक भाषा आणि पात्राच्या स्वभावानुसार देहबोली मी साकारली आहे. याचे मुख्य कारण मुळात मला ८ ते १० भाषा अवगत आहेत. त्यामध्ये संवाद साधण्याची मला आवड आहे. भेळ विकणारा भय्या, पोलीस, ऑफिसातला चपराशी अशा अनेक व्यक्तिरेखांचे प्रवास किंवा इतर वेळी भेटतात तेव्हा त्यांचे निरीक्षण करतो. एक नट म्हणून त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न असतो. आत्मसात केलेले रंगभूमीवर सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यासाठी एका व्यक्तिरेखेतून दुसऱया व्यक्तिरेखेत शिरणं आणि संवाद साधत भाषा बदलणं अनोखं कसब प्रेक्षकांना या नाटकात पाहायला मिळेल.

शेवटच्या शब्दापर्यंत वाक्य लोकांना ऐकायला जायला हवं. कधी कधी सुरुवातीचा आवाज शेवटपर्यंत राहात नाही. यासाठी मला अरुण नलावडेंनी मदत केली. त्यांची दिग्दर्शनाची पद्धत वेगळी आहे. नेपथ्यही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे दिसणारं घर वेगळ्या पद्धतीने साकारलंय. नाटक सुरू असतानाच मागचा सेट बदलत असतो. अशा पद्धतीने राजन ताम्हाणे यांनी केलेलं नाटकाचं नेपथ्यही वैशिष्टय़पूर्ण आहे. शिवाय माझी एन्ट्री प्रेक्षकांमधूनच होते आणि त्यांच्यातलाच एक म्हणून तिचा शेवट होतो. अशोक पत्की यांचं संगीत या नाटकाला लाभलं आहे. नाटकाची मुक्त बांधणी आणि रसिकांना आपण नाटकातलाच एक भाग आहोत, असं वाटत राहतं.

नाटक ही कार्यशाळा
रंगभूमीकडे प्रेक्षकांनी वळणं गरजेचं आहे. प्रत्येक नटासाठी नाटक ही कार्यशाळा असते. जर मी स्वतःला ‘नट’ समजत असेन तर नाटक हा माझ्यासाठी व्यायाम आहे. नाटकातून तुमचं चांगलं-वाईट काम लगेचच कळतं. प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद लगेचच मिळते. नाटकाची आठवण प्रेक्षक आणि नटाच्या मनात कायम राहते. हा फरक मालिका, चित्रपट करण्यात आहे, असे त्यांचे मत आहे.

निरागस मनोरंजन…
निखळ आनंद, निरागस मनोरंजनासाठी प्रेक्षकांनी हे नाटक पाहावं. यातील प्रत्येक पात्र वेगळ्या प्रकारचा संदेश देतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी ताणतणाव असतातच. त्याकरिता तणावमुक्तीसाठी हे नाटक पाहावं. महत्त्वाचं म्हणजे ज्या जोडप्याचं आपसात पटत नाही. अशांनी हे नाटक बघितल्यावर त्यांच्या वागण्यात बदल होऊन त्यांचा संसार सुखाचा व्हायला निश्चितच मदत होईल तसेच लग्न करावसं न वाटणाऱया मुला-मुलींचंही मनपरिवर्तन हे नाटक पाहिल्यावर निश्चितच होईल, असा ठाम विश्वास दिगंबर नाईक व्यक्त करतात.