बालरंगभूमीमुळे कलाकार झालो! दिलीप प्रभावळकर यांचे मत

सामना प्रतिनिधी । ठाणे

‘मी प्रौढ असलो तरी बालनाट्यांमध्ये केलेल्या कामांमुळे मी एक उत्कृष्ट कलाकार झालो’, असे उद्गार ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप प्रभावळकर यांनी काढले. बालनाट्यातील अजोड कामगिरीबद्दल यंदाचा गंधारगौरव पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सत्कारानंतर अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांनी प्रभावळकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी बालनाट्यभूमीचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

गंधार कलासंस्थेतर्फे बालरंगभूमीवरील कलाकार, नेपथ्यकार, केशभूषाकार, प्रकाशयोजना अशा विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिलीप प्रभावळकर यांना या वर्षीच्या गंधारगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मुलाखतीत बालनाट्याचा आपल्या जीकनात मोठा काटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रतिभा मतकरी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, आमदार संजय केळकर, सभागृहनेते नरेश म्हस्के, दिग्दर्शक विजू माने, लीना भागवत, प्रा. प्रदीप ढवळ, अशोक बागवे, कलाकार विजय गोखले, संस्थेचे संस्थापक प्रा. मंदार टिल्लू उपस्थित होते.