अण्णा नाईकांचो पुढाकार, जवानांसाठी उभारला मदतनिधी

80

मंगेश दराडे । मुंबई

ज्या सैनिकांच्या जिवावर आपण निर्भयपणे जगतो त्या सैनिकांच्या मदतीसाठी आता ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची टीम सरसावली आहे. मालिकेतील अण्णा नाईक या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या पुढाकाराने सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला असून यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे. मालिकेचे शूटिंग पाहायला येणाऱया फॅन्सचादेखील या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचे शूटिंग सावंतवाडीपासून अवघ्या 5-6 कि.मी. अंतरावर असलेल्या आकेरी या गावात सुरू आहे. कलाकारांनी मालिकेच्या निमित्ताने येथेच तळ ठोकल्यामुळे अण्णा नाईक आणि शेवंतासह सर्व कलाकारांना पाहण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आकेरी येथे मोठी गर्दी होते. आकेरी आता टुरिस्ट स्पॉट ठरत आहे.

या गर्दीच्या सहभागाने आपल्या देशातील सैनिकांसाठी काही करता आले तर ? अशी कल्पना माधव अभ्यंकर यांना सुचली. जानेवारीपासून त्यांनी सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवायला सुरुवात केली. ‘सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट, सैनिकहो तुमच्यासाठी!’ असे या ड्रॉप बॉक्सवर लिहिले आहे. मी तुमच्यासोबत सेल्फी काढेन, पण आपल्या सैनिकांसाठी शक्य ती मदत करा, असे आवाहन अभ्यंकर फॅन्सना करतात. फॅन्सनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून अगदी 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत जो तो आपल्या परीने सैनिकांसाठी मदत करताना दिसत आहे.

सैनिकांच्या मदतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. ती यानिमित्ताने पूर्ण झाली. आमच्या टीमपासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली. फॅन्सनीदेखील आमच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एक ड्रॉप बॉक्स पूर्ण भरला असून लवकरच दुसरा बॉक्सदेखील भरेल. त्यानंतर दोन्ही बॉक्समध्ये जमा झालेला निधी आम्ही सैनिकांच्या मदतीसाठी पंतप्रधान निधीला देऊ.
 माधव अभ्यंकर, अभिनेते

आपली प्रतिक्रिया द्या