अभिनेता राम कपूरवर ३५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता राम कपूर विरोधात सत्र न्यायालयामध्ये फसवणूकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. कुलाब्यातील बेस्ड मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी नावाच्या कंपनीकडून ३५ लाख रूपये कर्जाच्या स्वरूपात घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र ते पैसे परत न केल्यामुळे राम कपूरच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

मावी एलएलपीने राम कपूरच्या विरोधात २१ जून २०१७ ला कुलाबा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये फसवणुकीचा आरोप केला आहे. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी पैशाची गरज असल्याचं सांगून पैसे घेतल्याचा कंपनीने आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या प्राथमिक तपासणीनंतर कुलाबा पोलिसांनी मावी एलएलपीला हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा सल्ला दिला. मावी बिझनेस वेंचर्सचे वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या वर्षीच्या मे महिन्यामध्ये लिंक लीगल इंडिया लॉ सर्व्हिसेसने कपूरला एक कायदेशीर नोटीस पाठवून त्याला कर्जाची परतफेड करण्यास सांगितले. या नोटीसमध्ये ऑगस्ट २०१६ कर्जाचे पैसे घेतल्यानंतर ते कपूरला ते एका महिन्याच्या आत २४ टक्के व्याजाने परत करायचे होते.

मावी एलएलपीचे सह-भागीदार कृष्ण कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ विश्वासाच्या आधारावर कुठल्याही कागदपत्राशिवाय राम कपूरला पैसे उधार देण्यात आले होते. मात्र मूदत उलटून ही जेव्हा कपूरने पैसे परत केले नाहीत तेव्हा आम्ही कुलाबा पोलिसांकडे गेलो. तेव्हा पोलिसांनी आम्हाला या प्रकरणासाठी न्यायालयात जाण्यास सांगितले.

मावी एलएलपीच्या तक्रारीनुसार, कंपनीने एचडीएफसी बँकेतील कुलाबा शाखेच्या चालू खात्यातील रक्कम कपूरच्या स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेच्या ब्रीच कॅन्डी शाखेमध्ये हस्तांतरीत केली होती. कर्जाबाबत कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्याची राम कपूरला कंपनीने विनंती केली होती. मात्र त्याने शेवटपर्यंत ती सही केली नाही. राम कपूरशी या प्रकरणी संपर्क साधला असता, मला याबाबत काहीही बोलायच नाही. अधिकारी या प्रकरणाचा शोध घेत आहेत असं ते म्हणाले. राम कपूरने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.