ओढ रंगभूमीची! – अभिनेता रावबा गजमल

नाटक आणि फक्त नाटकच करायचंय आणि तेच करणारआत्ता तेच करतोय. या जिद्दीने नाटय़क्षेत्रातील एकांकिका विश्वात मनसोक्त वावरणारा रावबा गजमल…  तो म्हणतो, मला झेपेल तेवढंच करेन. नाटक करतो ते मनापासून करतो. मनातल्या भावना नाटकाद्वारे व्यक्त करतो. स्पर्धा, पारितोषिक हे काही ठाऊक नाही, असं तो आवर्जून सांगतो.

अभिनेता रावबा गजमल हा मूळचा गेवराईचा. किनगाव त्याचं गाव. तालुका बीड. तेथेच त्याचं माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर संभाजीनगरला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्याने नाटय़शास्त्र्ा विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी प्रॅक्टिकल म्हणून एक नाटय़ स्पर्धा असते. त्यात एकांकिका स्वतः दिग्दर्शित करावी लागते. तेथून त्याची सुरुवात झाली. कॉलेजमध्ये असताना तीनही वर्षी एकांकिका दिग्दर्शित केली. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी त्याच्या एकांकिकेला पहिले पारितोषिक मिळाले. प्रत्येक वर्षी एक एकांकिका करायची मग त्याला सवयच जडली.

कोणतीही व्यक्तिरेखा साकारायची तर तिचा अभ्यास करावा लागतो. याबाबत बोलताना रावबा म्हणतो, ‘भक्षक’ एकांकिकेमध्ये मी वाघाची व्यक्तिरेखा केली होती. वाघ करायचा म्हणजे मांजरीच्या हालचाली पाहिल्या. इनोसंटपणा मांजरीकडून शिकलो. त्यामुळे वाघ चांगला साकारता आला. त्याआधी ‘माणसं’ एकांकिका केली होती त्यात खूप वानरं दाखवायची होती. तेव्हाही रस्त्यावर डोंबारी माकडं फिरवतात त्या वानरांकडे पाहूनच तसा अभिनय केला. व्यक्तिरेखेचा अभ्यास करावाच लागतो. तरच ती खरीखुरी साकारता येते.

दिग्दर्शनासोबत अभिनयही

दिग्दर्शन आणि अभिनय यापैकी काय निवडशील असं विचारता रावबा म्हणतो, दिग्दर्शन तर करतोच आहे. पण अभिनय करायला जास्त आवडते. दिग्दर्शनातून वेळच मिळत नाही. पण त्यातूनही वेळ काढून अभिनय आवर्जून करतोय. मागच्या वर्षी एक लघुपटही केला होता. कश्मीर वर्ल्ड फिल्म फेस्टीवलमध्ये या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला.