शेवंतासाठी अपूर्वाने वाढवले वजन

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘रात्रीस खेळ चाले’मध्ये शेवंताची‘ एंट्री झाल्यानंतर ही मालिका एका अतिशय रंगतदार वळणाकर आली आहे. शेवंताच्या एंट्रीमुळे या मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. शेवंताची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, सोशल मीडिया साईट्सवरदेखील शेवंताचे मिम्स, पोस्ट्स, फोटोज आपल्याला दररोज पाहायला मिळतात. ही व्यक्तिरेखा जितकी लोकप्रिय झाली आहे तितकीच ती साकारणं हे अपूर्वासाठी आव्हानात्मक होत आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अपूर्वाने 5 ते 7 किलो वजन वाढवलं आहे. जेव्हा मी प्रेक्षकांसमोर शेवंता म्हणून आले तेव्हापासून मला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर तर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सगळं पाहून मला खूप बरं वाटतंय, असे अपूर्वा म्हणाली.