…म्हणून ही अभिनेत्री म्हणतेय ‘कोणी घर देता का घर’

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सध्या नवीन घराच्या शोधात आहे. वांद्रे येथील घराची डागडुजी सुरू असल्यामुळे ती आपल्या राहत्या घराच्या आजूबाजूला नवीन घराचा शोध घेत आहे. जॅकलिन सध्या जिथे राहते त्या इमारतीतील काही मजले हे तिच्या घर आणि कार्यालयाने व्यापले आहेत, जॅकलिन याहीपेक्षा मोठ्या जागेच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. ती नवीन घर शोधण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती येत्या वर्षभरात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चाही सध्या बी-टाऊनमध्ये रंगल्या आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या कामात व्यस्त आहे. रिमो डिसुझा दिग्दर्शित ‘रेस ३’ या चित्रपटात ती अभिनेता सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या दोघांचा हा चित्रपट ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास जॅकलिन व तिचे सहकारी वांद्रे मध्ये नवीन घराच्या शोध घेताना दिसले.

‘रेस ३’ ह्या चित्रपटासाठी तिने चांगलीच कंबर कसली असून लवकरच ती अबू धाबी व दुबई या देशात शूटींगसाठी जाणार आहे. पण त्याआधी आपले ‘ड्रीम होम’ व्हावे, अशी तिची अपेक्षा आहे.