VIDEO: भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

सामना ऑनलाईन । बुलढाणा

मुंबईत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्याचे पदसाद संपूर्ण राज्यभर उमटत असतानाच बुलढाण्यात भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे भाजपच्या नेत्या, जिल्हा परिषद सदस्य श्वेता महाले यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री नेहा पेंडसे हिला बोलावण्यात आले होते. नेहाला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. परंतु नेहा स्टेजवर येत असताना तिला धक्काबुक्की करण्यात आली. ढिसाळ नियोजनामुळे नेहा प्रचंड संतापली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेली. यावेळी स्टेजवर नेहाने आयोजकांजवळ कठोर शब्दात आपला संताप व्यक्त केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नेहा म्हणाली की, ‘एखादा सेलिब्रिटी आल्यावर लोकांचा उत्साह वाढतो. फोटोग्राफी आणि व्हिडीओसाठी गर्दी होते. परंतु त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसोबत हेळसांड होऊ देऊ नका. तसेच अशा कार्यक्रमाला बाऊंसर असतात, परंतु आयोजकाजवळच्या माणसांचा उत्साह काही केल्या आटोक्यात येत नाही व बाऊंसर आयोजकाची आतलीच माणसे असल्याने ती फक्त क्राऊड कन्ट्रोल करत असतात. परंतु याच वेळेस स्टेजवर आयोजकांच्या जवळील लोकांनी धक्काबुक्की केली. जवळपास अर्धातास हा प्रकार सुरू होता आणि जेव्हा हे कन्ट्रोलमध्ये आले नाही तेव्हा मी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.’