मराठी इंडस्ट्रीतला आपलेपणा भावला!

177

सामना प्रतिनिधी । मुंबई

उडाण, काशी, सारा आकाश अशा अनेक हिंदी मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सई देवधर. लवकरच सई ‘मोगरा फुलला’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत…

सई देवधर भूमिकेबाबत म्हणाली, यात मी असिस्टंट बँक मॅनेजरची भूमिका साकारतेय. शिवांगी गुप्ते असे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ती जगाला आपण खूप कणखर असल्याचे दाखवते, मात्र आतून ती खूप हळवी आहे. तिच्या आयुष्यात सुनील (स्वप्नील जोशी) आल्यावर तिचे आयुष्य कशाप्रकारे बदलते हे सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. सईची आई म्हणजे श्रावणी देवधर यांनीच या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आईसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ती म्हणाली, लपंडावनंतर खूप गॅपनंतर मी आईसोबत काम करतेय. शूटिंगपूर्वी एक वर्षापासून आई स्क्रिप्टवर काम करत होती. तेव्हापासून मी या सिनेमाशी जोडले गेले. प्रत्येक व्यक्तिरेखा लिखाणातून तिने कशाप्रकारे जिवंत केली हे मी तेव्हापासून पाहते आहे. त्यामुळे एक कलाकार म्हणून मी पूर्णपणे स्वतःला तिच्याकडे सोपवले. कलाकार म्हणून तिनेही आम्हाला खूप स्वातंत्र्य दिले. मराठी आणि हिंदी इंडस्ट्री यात काम करताना काय फरक जाणवला याबाबत ती म्हणाली, हिंदी इंडस्ट्री खूप प्रोफेशनल आहे, पण मराठीतला आपुलकेपणा मला जास्त भावला.  

…म्हणून मराठी सिनेमांच्या ऑफर्स आल्या नाहीत!

मराठी सिनेमापासून दूर का राहिलीस? याबाबत विचारल्यावर सई म्हणाली, खरं सांगायचं तर मराठी सिनेमांच्या ऑफर मला आल्याच नाहीत. मी हिंदी मालिकांत व्यग्र असल्यामुळे मी मराठीत काम करेन का? मला मराठी बोलता येईल का? असा प्रश्न कदाचित सर्वांना पडला असावा, पण या सिनेमामुळे सगळ्यांचे गैरसमज दूर होतील, असे ती सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या