५ देवदूत

>> अदिती सारंगधर, [email protected]

तिच्या आयुष्यातला एक कठीण टप्पा ओलांडून कदाचित ७२ मैलांपेक्षाही जास्त कठोर प्रवास करून ती इथे भक्कम उभी आहे. स्वतःचं ‘मी’पण जपताना ‘मी पण’ आहे सांगत… आपलं असणं, दिसणं, वागणं, राहणं यालाच साधन बनवून प्रत्येक भूमिका चोख आपल्यापर्यंत पोहोचवून अनेक पुरस्कारांची बिरुदं मिरवणारी माझी मैत्रीण स्मिता तांबे!

‘अय्या, ही किती छान काम करते ना?’, ‘पण सध्या कुठे गायब आहे’, ‘मराठीत नाही दिसली बाबा’, ‘कुणी काम विचारत नसेल गं!’ या सगळय़ा प्रश्नांचं गप्प करणारं उत्तर आहे… ती एक अप्रतिम असा आंतरराष्ट्रीय सिनेमा करतेय… अनेक हिंदी चित्रपटातून ती दिसणारे… आणि आज आपल्या या कॉलममधून भेटणार आहे तब्बल पाच डामरट मुलांची मम्मी, आई, अम्मा…!

‘ग्रीन टी पिणार?’ घरी मी गेल्यावरचा पहिल्या प्रश्न आणि मी ‘हो।़।़’ म्हणेपर्यंत एन्जल धावत आला आणि ‘ओ।़।़ बाई, कोण तुम्ही? आधी माझ्याकडं हजेरी द्या’, असं म्हणून जवळ जवळ दटावलं. मागोमाग राखाडी रंगाची गुबगुबीत, फरी परी आली… ती जवळबिवळ येण्याच्या फंदात पडली नाही. लांबूनच रोखून बघत होती. मागून अचानक वरून उडी मारून एक आणि सोफ्याच्या मागून एक असे शुभ्र शुभ्र क्युटी आणि क्युपिड आले… धडाधड सेना समोर उभी ठाकली. आईनं चहा-बिहा हातात ठेवल्यावर ‘बहुतेक ही नवीन आलेली बया बराच वेळ थांबणार’ असं लक्षात येऊन पांगली… आपापल्या जागेवर जाऊन पहुडली…

मला प्राण्यांची आवड नसली तरी निर्दयी तरी नाहीच गं मी… भर थंडीत माझ्या नाटकाच्या रंगीत तालमीला निघाले होते… रस्त्यात एका ठिकाणी जरा गर्दी दिसली. कुतूहल आणि भीती अशा संमिश्र भावनांनी गर्दीत घुसले… तर एक मांजराचं अगदीच नुकतंच जन्मलेलं, फार फार तर २ ते ३ दिवसांचं काळंपाढरं इवलंसं पिलू ओरडत होतं… अंगाला किडे लागले होते. त्यानं त्रास होत होता त्याला… बाप रे।़।़ कसंसंच झालं… तसंच अंगाला गुंडाळलेल्या ओढणीत त्याला घेतलं. कामवाल्या मावशींना फोन लावला… मावशी एक मांजराचं पिलू अडचणीत आहे. त्याला घरी घेऊन येतेय…’ मावशी म्हणाल्या, ‘मी नाही बाई. मला मांजराचा त्रास होतो…’ ‘ओके, ठीक आहे मावशी. मग आजपासून नका येऊ कामाला. दुसरी नोकरी शोधा. कारण मांजर घरातच राहणार’, असं म्हणून घरी आले तर डेटॉल, गरम पाणी, गादी वगैरे सगळं तयार करून मावशी तयार होत्या. त्यांच्या ताब्यात त्याला सोपवलं आणि मी धावत रंगीत तालमीला… घरी परत येईपर्यंत गरम पाण्यानं आणि डेटॉलनं पुसून अंगाला औषधी पावडर लावून पोटभर दूध पिऊन गादीवर बाळ शांत झोपलं होतं. मावशीच्या कृपेनं त्याक्षणी त्याला बघून मला फक्त आणि फक्त एंजल सुचलं. तो एंजल बनून माझ्या आयुष्यात आला होता आणि माझी तालीमही कमाल झाली होती. असा हा घरी आला आमचा शुद्ध देशी इंडियन बोका… पुढं मावशी आणि त्याची इतकी गट्टी झाली की, ८ दिवसांनी मी शूटिंगहून आल्यावर मावशी त्याचं टाइमटेबल सांभाळत फिरत होत्या…

शूटिंगमुळे सारखंच फिरायला लागतं… डबिंगला जावं लागतं… सुरुवातीच्या काळात एंजल घरी आला तेव्हा मी प्रचंड बिझी होते. या अवस्थेत त्याला घरी ठेवून जाववत नव्हतं. मग ओढणीची झोळी तयार केली… बोकोबांना त्यात घातलं. खाण्याच्या सामानाचा लिटर ट्रे सोबत घेतला आणि त्याला घेऊन डबिंगला… थंड एसीमध्ये शांतपणे झोपेल तर तो एंजल कसला… टकामका क्रीन आणि आत डबिंग करणाऱया मला हुं की चुं न करता बघत होता. जणू माझी आई सेलिब्रिटी आहे हे समजल्यासारखा… हळूहळू तो पूर्ण बरा झाला आणि घराचा राजा झाला, पण प्रत्येक वेळी त्याला बरोबर नेणं शक्य नव्हतं. म्हणून चांदोबा आणि परी आले. हे पर्शियन ब्युटीज आलेत. इथूनच एकाकडे खूप बेबीज आल्या, तर त्या मी ऍडॉप्ट केल्या. पण त्या आल्यावर एंजलचा फूल जळफळाट… आणले कशाला तर त्याचा एकटेपणा दूर व्हावा म्हणून… पण झालं उलटंच. एंजल आहे खूप पझेसिव्ह त्याच्या गोष्टीसाठी आणि चांदोबा नि परी बागडतायत सगळीकडे, घेतायत त्याच्या वस्तू… एकदा अशी करकचून जुंपली त्यांची की, एकमेकांचा जीव घेतला असता. मग चांदोबा वर बेडरूममध्ये शिफ्ट झाला. त्यानं ती त्याची टेरीटरी बनवली, जिथे एंजलला प्रवेशच निषिद्ध आणि स्वतःही पेशवा. त्या बेडरूममधून खालीच येणार नाही. तरीच इतका वेळ चहा पित पित मी त्याला शोधत होते तो सापडतच नव्हता. बेडरूममध्ये जाऊन बघितलं तर महाराज त्या मोठ्ठय़ा बेडवर तंगडय़ा पसरून पहुडलेत… कोण आलंय म्हणून जुजबी मान वर करून मला पाहिलं, पण अजिबातच भाव-बिव दिला नाही… जवळ गेले तर उठून दुसऱया उशीवर… डांबरट… फोटोसाठीही खाली आला नाही.

चांदोबा आणि परीची दीड वर्षाची पोरं म्हणजे क्युटी आणि क्युपिड. खरं तर परीचा बॉयफ्रेण्ड एंजल, पण लग्नबिग्न तिनं तिच्याच प्रजातीत चांदोबाशी केलं… आणि प्रेग्नंट राहून अनेक दिवस उलटले तरी मला कळलंच नव्हतं… व्हॅक्सिनेशनसाठी डॉक्टरांकडे नेलं तेव्हा म्हणाले, २ ते ३ आठवडय़ांत डिलिव्हरी होईल हिची… मी शॉक्ड… एकदा घरी मित्रमंडळी आलेली असताना परी दमल्यासारखी धापा टाकत होती. चटकन उचलून तिला वरच्या बाथरूममध्ये नेली. फक्त ती आणि मी… शांत म्युझिक सुरू केलं. परीनं तिची नखं, पंजे घट्ट माझ्या हातात रोवले होते आणि कळ आली की, पकड घट्ट व्हायची. असं करता करता २ गोंडस पिलं दिली तिनं. आज दीड वर्षाचा अख्खा सुंदर प्रवास समोर पाहिला… मला बदलवून टाकणारा मला आई करणारा, माझा आनंदी क्षणांचा ठेवा…

साधारण हे सगळे जण कॅट फूड खातात. पण चांदोबाला नेहमी वर त्याच्या राजमहालात द्यावं लागतं. मी बाहेर न सांगता निघाले की, एंजल आजारीच पडणार. एकदा तर चक्कर येऊन पडला. घाबरून डॉक्टर घेऊन गेले. त्यांनी एक चापटी दिल्यावर म्यॉव करून उठला. डॉक्टर म्हणाले, नाटक केलंय त्यानं. तुम्ही बाहेर चालला आहात का? एकदा रात्री ११.३० वगैरे वाजले घरी यायला तर एंजलनं त्याची गादी लिटर ट्रे ओढत ओढत दरवाजात आणून ठेवला आणि जसा मी दरवाजा उघडला तसा हा घराच्या बाहेर… मला इतका उशीर झाल्यानं चिडला होता हा शहाणा… हातापाया पडून ‘सॉरी’ म्हणून विनवण्या करून कसंबसं त्याला आत आणलं. ‘बाई, इतकी नाटकं कोणीच केली नाहीत माझ्याबरोबर.’ हसत स्मिता सांगत होती.

इतका वेळ जरा घाबरणारी परी आणि पिलं हळूहळू माझ्या बाजूला आली… अंग माझ्या हाताला घासायला लागली…

एव्हाना आमचा ग्रीन टी संपला होता. अजून एकेक कप म्हणून उठलो तर एंजल देव्हाऱयाच्या वर झोपला होता. त्याची तीच जागा आहे… खाली आरती वगैरे सगळं सुरू असलं तर तो देव्हाऱयावर… माझी जी जागा होती तिथे परीनं कब्जा केला होता… कारण तिथे फॅन होता आणि बाकीचे दोघं क्रमशः गॅसवर आणि ओटय़ावर… कसला ग्रीन टी नं कसलं काय? मला उल्लू बनवून उठवण्यासाठी हा सगळा गेम प्लॅन केला होता… फ्रेश व्हायला म्हणून मी टॉयलेटमध्ये गेले तर हात धुताना अचानक दरवाजा उघडला तर हँडलला लटकलेला क्युपिड हँडल खाली खेचणारी क्युटी आणि फट होताच दार ढकलणारा एंजल सगळे दिसले… आईशप्पथ कॅमेरा त्या क्षणी मी सगळय़ात जास्त मिस केला… ‘अगं, लाज आणतात गं ही पोरं… अशी लॉक उघडतात म्हणून आत मुद्दाम कडी केलीय’ एकदम शरमल्या स्वरात स्मिता सांगत होती… मला तर खूप खूप खूप जास्त हसायला येत होतं…

‘रात्री कित्तीही उशिरा आले तरी लपाछपीचा एक डाव खेळावाच लागतो. आमच्या ठरलेल्या जागा आहेत तिथं जाऊन मी लपणार आणि ही सगळी (चांदोबा शेठ सोडून) मला धडकणार… ते संपलं की, मग चांदोबाकडे वर जायचं… त्यांच्याशी मस्ती करायची, मग उपकार केल्यासारखी बेडवर थोडी जागा तो देऊ करणार… आणि झोपलं की, सरकत सरकत हळूच मिठीत येऊन झोपणार… मांजरं थोडी स्वार्थी आहेत असं म्हणतात, पण मला उलट त्यांनी केलेलं निरपेक्ष प्रेम, प्रेमाची जवळीक आणि दिलेला अपार आनंद एवढंच जाणवलं. आज मी त्यांच्या सोयीनं दिवस प्लॅन करते. माझी पोरं मला खूप समजून घेतात. को-ऑपरेट करतात आणि हवी असलेली स्पेस आणि स्वातंत्र्यही देतात, पण बरोबर आई म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीवसुद्धा करून देतात.

एंजलला माझ्या इमोशन्स पटकत कळतात… मग मी डाऊन असले की, मोठा दादा म्हणून घराचा ताबा घेतो आणि ‘आज नीट वागायचं… नो त्रास आईला!’ असं जणू सगळय़ांना समजावतो. त्यांच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ते स्वप्नातसुद्धा शून्यच आहोत. ही लागलेली सवय आणि जडलेलं व्यसन (त्यांच्यासाठी जगायचं) दोन्ही हवंहवंसं आहे.

एव्हाना ६.३० वाजले होते… मला निघायचं होतं. सो सगळय़ांना बाय बाय करून एक टपरी चाय टाकायला दोघी घरातून बाहेर पडलो, पण पुन्हा या सगळय़ांबरोबर एक इव्हीनिंग पार्टी करायचं ठरवूनच…
‘स्मिता, खूप मज्जा आली. बाय… भेटूच!’’