‘दिग्दर्शकाने दारूच्या नशेत रूममध्ये बोलावले आणि ….,’ बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाबाबत सोशल मीडियावर #MeToo नावाचे कॅम्पेन सुरू केल्यानंतर जगभरातील महिला लैंगिक शोषणावर बोलत आहेत. सेलिब्रिटीही त्यांच्यासोबत झालेल्या या कटू प्रसंगांच्या आठवणी जाहीरपणे सांगत सोशल मीडियाच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठविताना दिसत आहेत. मूनमून दत्ता, विद्या बालन यांच्यानंतर स्वरा भास्कर या अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाविरोधात आवाज उठवला आहे.

एका मुलाखती दरम्यान पत्रकाराने स्वराला तुझ्यासोबतही कधी लैंगिक छळासारखी घटना घडली आहे का? असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना स्वरा म्हणाली की, ‘हो, माझ्यासोबतही अशी घटना घडली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त मी ५६ दिवस बाहेर होते. त्याठिकाणी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने माझा लैंगिक छळ केला. सेटवर दिग्दरर्शक दिवसभर माझ्यावर नजर ठेवून होता. तो मला सतत मेसेज पाठवत होता.

एकदा त्याने एका सीनबाबत चर्चा करण्यासाठी मला रूममध्ये बोलावले. जेव्हा मी रूममध्ये पोहोचले तेव्हा तो दारू पित होता. त्यानंतर त्याने माझ्यासोबत जबरदस्तीने प्रेम आणि संभोग या विषयावर बोलू लागला. त्यानंतर एकदा तो दारूच्या नशेमध्ये माझ्या हॉटेलच्या रूममध्ये जबरदस्ती घुसला आणि मला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या अशा वागण्यामुळे मी खूप व्यथित झाले होते. शूटिंग संपल्यानंतर मी हॉटेलमधील रूममधील सर्व लाईट बंद करून ठेवायचे. कारण, त्याचा असे वाटावे की मी आता झोपले आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलताना स्वराने ही माहिती दिली आहे.