ब्राह्मण समाजाविरूद्ध गरळ ओकणाऱ्या ‘आदर्श शिक्षका’चा पुरस्कार रद्द

ब्राह्मण समाजाच्या वतीने भाऊसाहेब गोरे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते.

सामना ऑनलाईन । जालना

ब्राह्मण समाजाविरोधात अर्वाच्च शब्दात बोलणारी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करणे एका आदर्श शिक्षकाला चांगलेच भोवले आहे. रामनगर येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांना राज्य शासनाने जाहीर केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या वतीने कदिम जालना पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर या शिक्षकाविरोधात कलम 295 अ, 153 अ, 354, 504, 509 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

ब्राह्मण समाजाविरूद्ध गरळ ओकणारा व्हिडीओ व्हायरल, आदर्श शिक्षकावर गुन्हा दाखल

रामनगर येथील शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब गोरे यांनी ब्राह्मण समाज व ब्राह्मण समाजातील महिला यांच्याविरोधात अश्लिल भाषेत वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे या संदर्भातील क्लिपही त्यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केली होती. याचा ब्राह्मण समाजाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता. याच दरम्यान शासनाने 2017-18 या वर्षासाठी राज्यातील आदर्श शिक्षकांची नावे घोषित केली. यात तालुक्यातील रामनगर येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांचा सुद्धा समावेश होता. यास ब्राह्मण समाजाकडून विरोध करण्यात आला. याविरोधा तक्रारही दाखल करण्यात आली. अखेर या तक्रारींची दखल घेत शासनाने परिपत्रक काढून गोरे यांना जाहीर झालेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार रद्द केला आहे. शासनाच्या या निर्णयाचे ब्राह्मण समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे.